दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाची हायकोर्टात धाव

मुंबई : शिवसेना दसरा मेळाव्याचा वाद आता हायकोर्टात पोहचला आहे. पूर्व परवानगी मागूनही पालिकेने अद्याप निर्णय घेतला नसल्याचे सांगत शिवसेनेच्या ठाकरे गटाने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाने गणेशोत्सवापूर्वीच महापालिकेकडे परवानगीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, महापालिकेच्या जी-उत्तर प्रभागाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. या प्रकरणी तातडीने सुनावणी करण्याची मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे. हायकोर्टात उद्या सुनावणी होणार आहे.

ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांच्या अर्जावर महापालिकेने कोणताही निर्णय घेतला नाही. यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेत मुंबई महापालिका आणि राज्य सरकार यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळू नये यासाठी राज्य सरकारचा महापालिकेवर दबाव असल्याचा आरोप विभागप्रमुख मिलिंद वैद्य यांनी केला आहे. दुसरीकडे शिवाजी पार्कचे मैदान दसरा मेळाव्यासाठी कोणालाही मिळणार नाही का? अशी चर्चा सुरु आहे. पालिकेच्या विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय समोर आला आहे. खरी शिवसेना कोणाची? हा निर्णय सध्या न्यायालयात प्रलंबित आहे, असे विधी विभागच मत आहे, त्यामुळे शिंदे किंवा ठाकरे या दोन्ही गटांना परवानगी देऊ नये, असा पालिकेचा अभिप्राय असल्याचे सूत्रांकडून समजते. तसेच ठाकरे आणि शिंदे गटात सध्या तणाव असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कोणत्याही गटाला परवानगी देऊ नये, असा विचार पालिका अधिकाऱ्यांचा सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.