१ ऑक्टोबरपासून राजभवन भेट पुन्हा सुरु

मुंबई ,१० सप्टेंबर /प्रतिनिधी :- तीन महिन्यांच्या पावसाळी अवकाशानंतर दिनांक 1 ऑक्टोबरपासून राजभवन भेटीची योजना पुन्हा सुरु होत आहे. आजपासून राजभवनाच्या संकेतस्थळावर यासाठी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. राजभवन भेटीची वेळ सकाळी 6 ते सकाळी 8.30 ही असेल व प्रतिदिवशी 30 लोकांना भेट देता येईल.

राजभवन हेरिटेज टूर मध्ये सूर्योदय गॅलरी, देवी मंदिर, भूमिगत बंकर, क्रांतिकारकांचे दालन, दरबार हॉल, जलविहार सभागृह व महाराष्ट्र राज्य स्थापना स्मारक येथे भेट देता येईल.

राजभवन भेटीचे दिवस मंगळवार ते रविवार हे असतील. सोमवारी तसेच शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी राजभवन भेट बंद असेल असे राजभवनातर्फे कळविण्यात आले आहे. दिवाळीमुळे 22 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत भेट देता येणार नाही.