सायरस मिस्त्रींच्या अपघातग्रस्त कारची डेटा चीप जर्मनीला पाठविणार

पालघर ,६ सप्टेंबर /प्रतिनिधी :- प्रसिद्ध उद्योगपती तसेच टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचे पालघर येथील चारोटी पुलावर कार अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पालघर पोलिसांनी प्राथमिक अहवालात सदरील घटना अतिवेगाने गाडी चालविल्यामुळे झाल्याचा ठपका ठेवला आहे. तर सखोल चौकशीसाठी जर्मनीला मिस्त्री यांच्या एसयुव्ही कारनिर्मिती कंपनीकडे कारची चीप पाठवली जाणार असून यामध्ये काही मेकॅनिकल फॉल्ट आहे का? याची तपासणीही होणार आहे.

रविवारी अहमदाबाद येथून सायरस मिस्त्री आपल्या कौटुंबिक मित्र परिवारासह मुंबईला येत होते. अहमदाबाद येथील प्रसिद्ध पारसी मंदिराला भेट देण्यासाठी ते गेले होते. दरम्यान रविवारी परतत असताना, पालघर येथील चारेटी पुलाजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला. यामध्ये त्यांचासह आणखी एकाचा जागीच मृत्यू झाला. तसेच पालघर पोलिसांच्या प्राथमिक अहवालानुसार गाडीचा अतिवेग असल्याचे समोर आले आहे.

गाडीचा वेग दिडशेच्या वर असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय अपघात झालेले ठिकाण हे पोलिसांकडून आदीच ‘धोकादायक जागा’ म्हणून घोषित करण्यात आले होते. तिन मार्गिकेचा रस्ता हा पुलावर येताना दोन मार्गिकेचा बनतो, त्यामुळे सदर ठिकाण हे ब्लॅक लीस्ट मध्ये टाकण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांकडून अपघाताचे विविध कारणे शोधण्याचा प्रयत्न चालू आहे.

यामध्ये आता अपघातावेळी कारमधल्या एअरबॅग्ज खुल्या का झाल्या नाहीत? कारमध्ये काही मेकॅनिकल फॉल्ट आहे का? कारच्या ब्रेक फ्ल्यूडचे काय झाले? कारच्या टायर प्रेशरचे काय? असे अनेक प्रश्न पोलिसांनी जर्मनबेस्ड कार निर्मिती कंपनीला विचारले आहेत. पोलिसांच्या या प्रश्नांची उत्तरे आपल्या रिपोर्टमध्ये देणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, कारनिर्मिती कंपनीने पालघर पोलिसांना माहिती दिली की, मिस्त्री यांच्या अपघातग्रस्त कारची डेटा रेकॉर्डर चीप डिकोडिंगसाठी जर्मनीला पाठवावी लागेल. जर्मनीत हे डिकोडिंग झाल्यानंतर पोलिसांकडे अपघातग्रस्त कारचे संपूर्ण डिटेल्स मिळू शकतील. या संपूर्ण प्रक्रियेसाठी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. या डेटा रेकॉर्डरमध्ये कारची संपूर्ण माहिती उपलब्ध असेल. यामध्ये कारच्या ब्रेकची स्थिती काय होती? एअरबॅग आणि इतर तांत्रिक बाबी काम करत होत्या का? अपघातावेळी कारचा वेग किती होता? या गोष्टींचा समावेश असेल.