शास्त्रोक्त ‘सेरो’ सर्वेक्षणास नागरिकांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी चौधरी

औरंगाबाद, दि.6:- जिल्ह्यात कोरोनामुळे झालेल्या प्रादुर्भावाच्या अटकावाकरीता तसेच त्या दृष्टीने पुढील उपाययोजना करण्यास प्रशासनाला मदत व्हावी यादृष्टीने आय.सी.एम.आर. च्या नियमावलीनुसार शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात येणाऱ्या ‘सेरो’ सर्वेक्षणात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोविड-19 आजाराच्या अनुषंगाने अँटीजन तपासणीच्या दृष्टीने ‘सेरो’ सर्वेक्षणाबाबतच्या नियोजनाबाबत बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते.यावेळी महानगरपालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडेय, जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, जनऔषध व वैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. जगन्नाथ दिक्षित, सुक्ष्म जीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योती बजाज, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. मुजीब सय्यद, जि. प. चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, एमजीएमच्या औषध विभाग प्रमुख डॉ. शोभा साळवे आदींची उपस्थिती होती.

शहरात दि 10 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट दरम्यान सेरो सर्वेक्षण होणार असून दि. 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान औरंगाबाद शहर तर 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान अनुक्रमे बजाज आणि वाळूज महानगर अशी विभागणी करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण दररोज 20 ते 25 वार्डांमध्ये करण्यात येणार आहे.हे सर्वेक्षण डॉ.मुजीब सय्यद, डॉ.जगन्नाथ दिक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर शरीरात विकसित होत असलेल्या ॲन्टीबॉडीज तपासण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने सर्वेक्षण करून निवडक चाचण्या करण्यात येणार आहेत. शहरात 4235 तर ग्रामीण भागात 1800 ते 2000 नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात येणार असून ही चाचणी अत्यंत साधी असून नागरिकांनी घाबरून जाण्याची अजिबात गरज नसल्याचेही श्री. चौधरी यांनी यावेळी सांगितले. ज्याप्रमाणे आपण रक्त तपासणी करतो त्याचप्रमाणे ही चाचणी होणार असल्याने नागरिकांनी सर्वेक्षणकर्त्यास सहकार्य करावयाचे असल्याचे श्री. चौधरी यांनी सांगितले. हे सर्वेक्षण अत्यंत पारदर्शक पद्धतीने होणार असून याकरीता नागरिकांना एक साधा कन्सेंन्ट फॉर्म भरून द्यावयाचा आहे.

या तपासणीसाठी रँडम सॅम्पलिंग पद्धतीने घटकांची निवड करण्यात येऊन शारत्रोक्त पद्धतीने तपासणीसह अभ्यास करण्यात येणार आहे.या सर्वेक्षणासाठी लागणारे सॅम्पल जिल्हा परिषद, महानगरपालिका एकत्रित करुन प्रयोगशाळेस तपासणीसाठी पाठवणार आहे.

या अभ्यासातून शहरात तसेच जिल्ह्यात कोरोनामुळे झालेला प्रादुर्भाव लक्षात येण्यास मदत होईल. तसेच प्रशासनाला सर्वेक्षणांती केलेल्या तपासणीतून पुढील दिशा ठरवण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आतापर्यंत केलेल्या उपाययोजना व करावयाच्या बदल याबाबत स्पष्टता येण्यास मदत होणार आहे. यापूर्वीच अशा पद्धतीचे सर्वेक्षण मराठवाड्यातील परभणी, बीड आणि नांदेड या जिल्ह्यात झालेले आहे, असेही श्री. चौधरी म्हणाले. तर मनपा आयुक्त श्री. पांडेय यांनी शहरातील 115 वॉर्डमध्ये पथके तैनात करुन वेळेत सॅम्पल गोळा करुन शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील.या तपासणीच्या माध्यमातून शहरातील सर्व घटकांची रँडमाईज पद्धतीने तपासणी करण्यात येणार आहे, असे यावेळी सांगितले.यावेळी म.ना.पा.च्या वैद्यकीय अधिकारी डॉ.नीता पाडळकर यांनी सर्वेक्षणा बाबत सविस्तर माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *