मेटेंच्या अपघाती मृत्यूची होणार सीआयडी चौकशी : मुख्यमंत्री

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची आता सीआयडी चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना याबाबत आदेश दिले आहेत. मेटेंचा अपघात की घातपात अशी शंका उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे.

विनायक मेटे यांच्या कुटुंबियांनी आणि समर्थकांनी त्यांचा मृत्यू अपघात की घातपात याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली होती. त्यामुळे या सर्व प्रकरणाची राज्य सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे.

मेटे यांच्या गाडीला १४ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने नवी मुंबईतील एम जी एम रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यावेळीच प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी या मृत्यची सखोल चौकशी करण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यानुसार आज त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ याना या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.