कलाक्षेत्रातील युगप्रवर्तकाचे निधन चटका लावणारे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रख्यात नाट्यकर्मी इब्राहिम अल्काझी यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. ४ :- भारतीय नाट्यसृष्टीचा कायापालट करणारे आणि रंगभूमीसह कला क्षेत्रातील अनेक दिग्गजांना घडविणारे युगप्रवर्तक असे इब्राहिम अल्काझी यांचे निधन चटका लावून जाणारे आहे. अल्काझींच्या निधनामुळे कला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली आहे.

Image

मुख्यमंत्री शोक संदेशात म्हणतात, अल्काझी यांचे भारतीय नाट्यसृष्टींचा कायापालट करण्यापासून ते आताच्या अनेक दिग्गज कलाकारांना घडविण्यात मोठे योगदान आहे. ते उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शक तर होतेच पण तितकेच उत्तम चित्रकार, छायाचित्रकार आणि शिल्पकारही होते. लंडनमधून युरोपियन नाट्यशास्त्राचा अभ्यास करून परतल्यावर त्यांनी भारतातही नाट्यक्षेत्रात बदलांचे युग आणले. कला क्षेत्रात त्यांनी ‘थियटर युनिट, जहाँगीर आर्ट गॅलरी, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा यांच्या माध्यमातून आयुष्यभर वेगवेगळे प्रयोग केले. मराठी रंगभुमीविषयी जिव्हाळा असणाऱ्या अल्काझी यांना आंतरराष्ट्रीय कलाक्षेत्रात मोठा सन्मान दिला जात असे. कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित अल्काझी यांच्यासाठी कला क्षेत्र हेच श्वास होता. त्यांच्या जाण्यामुळे नाट्यक्षेत्रासह अनेक कलांचा अभ्यास असणारा व्यासंगी आधारवड गेला आहे. त्यामुळे भारतीय कला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अल्काझींचे भारतीय कला क्षेत्रातील योगदान कदापिही न विसरता येणार नाही. कलाक्षेत्राच्या या युगप्रवर्तकाला भावपूर्ण श्रध्दांजली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची इब्राहिम अल्काझी यांना श्रद्धांजली

ख्यातनाम नाट्यकर्मी, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी संचालक, पद्मविभूषण इब्राहिम अल्काझी यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले  असून भारतीय नाट्य, कलासृष्टीतील ऋषितुल्य व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दात  उपमुख्यमंत्र्यांनी इब्राहिम अल्काझी यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात, पुणे येथे जन्मलेल्या इब्राहिम अल्काझी यांचं पुण्याशी, महाराष्ट्राशी आणि मराठी भाषेशी  विशेष नातं होतं. देश पातळीवर काम करताना त्यांनी अनेक प्रतिभासंपन्न कलाकार घडवले. भारतीय नाट्य आणि कलासृष्टी  समृद्ध करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. भारतीय कलाक्षेत्राला त्यांनी दिलेला  जागतिक दृष्टिकोन, त्यांनी घडविलेल्या कलाकारांच्या पिढ्या त्यांची स्मृती चिरंतन ठेवतील. इब्राहिम अल्काझी  या महान कलावंताला भावपूर्ण श्रद्धांजली.

इब्राहिम अल्काझी यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

सामाजिक चळवळीतील झुंजार कार्यकर्ता हरपला

 राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ख्यातनाम नाट्यकर्मी व नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी संचालक पद्मविभूषण इब्राहिम अल्काझी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.इब्राहिम अल्काझी हे वैश्विक दृष्टीकोन लाभलेले नाट्यकर्मी होते. ते प्रतिभासंपन्न कलाकार, कलाप्रेमी व गुरु होते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या संचालकपदाच्या प्रदीर्घ कार्यकाळात त्यांनी कलाकारांच्या अनेक पिढ्या घडविल्या. त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटके त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेची साक्ष देतात. त्यांच्या निधनाने भारतीय कला नाट्य क्षेत्राने एक अद्भुत रत्न गमावले आहे, असे कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *