म्हाडा, आरोग्य आणि टीईटी घोटाळ्याचा तपास ईडी करणार

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वाधिक गाजलेल्या म्हाडा, आरोग्य आणि टीईटी घोटाळ्याचा तपास आता ईडीकडे जाण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांनी म्हाडा, आरोग्य आणि टीईटी परीक्षेच्या संदर्भात झालेला घोटाळा उघडकीस आणला होता. याप्रकरणी काही बड्या अधिकाऱ्यांना देखील पुणे पोलिसांनी अटक केली होती. या संपूर्ण प्रकरणाची कागदपत्र तपासासाठी ईडीने पुणे पोलिसांकडून मागून घेतली आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी ही सर्व कागदपत्र ईडीच्या ताब्यात सोपवली आहेत.

राज्यातील आरोग्य विभागातील भरती परीक्षेतील पेपरफुटीचा तपास करताना पुणे सायबर पोलीसांना म्हाडा परिक्षेचा पेपर फुटल्याचे समजले होते. तर म्हाडाच्या पेपरफुटीचा तपास करताना टीईटी परिक्षेत गैरव्यवहार झाल्याच समोर आले होते.

दोन दिवसांपुर्वी 2019 साली झालेल्या टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परिक्षेत 7800 विद्यार्थी बोगस पद्धतीने पात्र ठरल्याचे पुणे सायबर पोलिसांच्या तपासात उघड झाले होते. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून या 7800 बोगस शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्याची यादी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार आहे. त्यांच्यावर कारवाईदेखील होणार असल्याचे सांगितले होते.

2019 ला 16 हजार 705 विद्यार्थ्यांनी टीईटी परिक्षा दिली होती. त्यापैकी 7800 विद्यार्थ्यां पैसै देऊन परिक्षा पास झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे आता राज्यातील वेगवेगळ्या शहरात आणि गावात बोगस पद्धतीने भरती होऊन नोकरी करणार्‍या शिक्षकांचे धाबे दणाणले आहे.

म्हाडा परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप एमपीएससी समन्वय समितीने केला होता. या प्रकरणाचा तपास करुन गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीने केली होती. याबाबत समितीने पुणे सायबर पोलिसांना पत्र सुद्धा लिहिले होते. शिवाय परीक्षा केंद्रावर घडलेल्या गैरप्रकाराचं सीसीटीव्ही फूटेज देखील समोर आणले होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता ईडी करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.