उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा:नारायण राणेंचा राजकीय घडामोडींवर ‘प्रहार’

मुंबई ,२१ जून /प्रतिनिधी :- एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतल्या ३५ आमदारांनी बंड केल्यामुळे राज्यातले महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत केली.

शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांचा शिवसेना नेतृत्वाकडून सतत होणारा अपमान, दिली जाणारी आश्वासने व आश्वासनांची कधीही पूर्तता नाही, भेटीची टाळाटाळ, हिंदुत्वाला सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीशी सत्तेसाठी तडजोड या सर्वांचा मनात स्फोट झाल्याने एकनाथ शिंदेंनी मंगळवारी पाऊल उचलले असणार. ५६ आमदारांपैकी ३५ आमदार शिंदेंसोबत गेल्याने सरकार अल्पमतात गेले आहे. बहुमत गमविले आहे, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी पदाचा राजीनामा द्यावा, असा प्रहार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्यातील एकनाथ शिंदेमय राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना लगावला आहे.

एकनाथ शिंदे प्रकरणाने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सध्याच्या शिवसेना नेतृत्वाकडून एकनाथ शिंदेंना सतत अपमानाची वागणूक देण्यात आली आहे. सतत आश्वासने दिली गेली; परंतु आजतागायत एकाही आश्वासनाची सेना नेतृत्वाने एकनाथ शिंदेंच्या बाबतीत पूर्तता केली नाही. यातूनच एकनाथ शिंदेंचा अखेरीला स्वाभिमान जागृत झाला व त्यातूनच हे बंड घडले असल्याचे नारायण राणे यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.

४८ वर्षे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष सांभाळला, वाढवला, शिवसैनिकांना प्रेम दिले. पण आताच्या प्रमुखांना मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या कालावधीत पक्ष सांभाळता आला नाही. शिवसैनिकांना सांभाळता आले नाही. मातोश्रीच्या पिंजऱ्यातून कधी बाहेर पडले नाहीत. केवळ आदेश देण्याचेच काम केले. त्यामुळे कुठे तरी भावनांचा बंध फुटला, आजवर केलेल्या त्यागाच्या भावनेतून एकनाथ शिंदेंनी बंडाचा निर्णय घेतला असावा, असे नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.

एकनाथ शिंदेंची भूमिका प्रसारमाध्यमांतून पाहिली. शिवसेनेचे प्रतिनिधी त्यांना भेटले असता, त्यांनी राष्ट्रवादी व काँग्रेस सोडून भाजपसोबत या. भाजपसोबत सरकार बनविले तरच विचार करू असे त्यांनी सेना प्रतिनिधींना चर्चेत सांगितले. याचाच अर्थ एकनाथ शिंदे हे हिंदुत्ववादी विचारांचे आहेत. अडीच वर्षांपूर्वी आपली फसवणूक झाल्याचे त्यांनी कबूल केले. सत्तेसाठी केवळ नेतृत्वाने तडजोड केल्याची त्यांना माहिती होती. एकनाथ शिंदे आमदारांसमवेत गुजरातला गेल्यावर उद्धव ठाकरेंनी एक मिनीटही मुख्यमंत्री पदावर राहायला नको होते, पण ती नैतिकता उद्धव ठाकरेंमध्ये नाही. त्यांना कायद्याबाबत किती माहिती आहे, याबाबतही प्रश्नचिन्ह आहे. ५६ आमदारांपैकी ३५ आमदार सोडून गेल्याने सरकार अल्पमतात गेले आहे. ते राजीनामा का देत नाहीत. कशाची वाट पाहत आहेत? असा प्रश्न नारायण राणे यांनी यावेळी विचारला आहे.

एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेबाबत त्यांचे अभिनंदन आहे. योग्य वेळी त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे. आनंद दिघेंच्या बाबतीत जे घडले तेच कदाचित एकनाथ शिंदेंच्याही बाबतीत घडले असते. आनंद दिघेंनाही नंतर मातोश्री बंद होती आणि त्यानंतर त्यांचे प्रेम ऊतू जाऊ लागल्याचा टोला नारायण राणेंनी यावेळी लगावला.

एकनाथ शिंदेंनी घेतलेला निर्णय योग्य व सुज्ञपणाचा आहे. त्यांची जडणघडण हिंदुत्ववादी विचाराने झालेली आहे. त्या विचारांशी त्यांनी बांधिलकी ठेवावी, अशी अपेक्षा ठेवतो. मविआ आता अस्तित्वात नाही, हे सरकार जाणार ही एक चांगली गोष्ट झाली. अडीच वर्षांत कोणताही विकास झाला नाही. केवळ सूडभावनेने कारवाई करण्यातच अडीच वर्षे घालविली. अपशब्द काढायचे, यातच समाधान मानल्याने मुख्यमंत्रीपदाचा मान व शान त्यांनी घालविल्याचे सांगताना जे घडले ते चांगल्यासाठीच घडल्याचे नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.

एकनाथ शिंदेंना मातोश्रीवर सतत अपमानित करण्यात आले. १० वेळा मुख्यमंत्री करतो असे आश्वासन दिले गेले. पद देण्याच्या नावाखाली पैसा खर्च करायला लावला, सतत फसवणूक केली. आश्वासन एकाला देऊन स्वत:च मुख्यमंत्री झाले. शब्द देणे व पाळणे हे त्यांना कधी जमलेच नाही. दिलेला शब्द पाळायचा असतो, हे त्यांना माहिती नाही. यातूनच हे बंड झाले असण्याची शक्यता नारायण राणे यांनी यावेळी व्यक्त केली.

शिंदे नगरविकास मंत्री असले तरी त्यांना अधिकार नव्हते. मातोश्रीबाहेर कोणालाहीअधिकार नसतात, पूर्ण अधिकार केवळ मातोश्रीला व ऑस्ट्रेलियापर्यंत गेलेल्या नातेवाइकांनाच आहेत. मविआकडे राज्याचे पोलीस असले तरी केंद्रात आम्ही आहोत. संजय राऊत सतत खोटे बोलतात.आज त्यांचा आवाज बसलाय, उद्या थंड होईल, संजय राऊतला कोणी घाबरत नाही. आज केवळ ११ आमदार वर्षावर होते, शिवसेना भवनवर ५० शिवसैनिक होते, अशी माहिती नारायण राणे यांनी दिली.

आपण आयुष्यात प्रेमाने माणसे जोडली आहेत. सर्वांशी चांगले संबंध जोडले आहेत. घरोबा आहे. पैसा व पदासाठी माणसे जोडली नाहीत. ५६ जणांचा गटनेता असतो. पण ११ किंवा १४ आमदारांचा गटनेता यांना मोठा वाटतो. एकनाथ शिंदेंच्या हकालपट्टीचा कोणाला अधिकार नाही. त्यांना अजून सेनेने पक्षातून काढले नाही. तो शिंदेंचा पद्धसिद्ध अधिकार आहे. सरकार आता अल्पमतात गेल्याने ते सत्तेवर राहत नाही. या लोकांनी वर्षा बंगला खाली करायला पाहिजे. साहेबांचे सतत नाव घेतले जाते, पण यांच्यामध्ये साहेबांचा एकही गुण नसल्याची टीका नारायण राणे यांनी यावेळी केली.

आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्व मानतो, स्वाभिमानी आहोत, लाचारी आमच्यात नाही, उद्धव ठाकरे पदासाठी काहीही करतात. हे प्रकरण घडल्यावर एकनाथ शिंदेंशी प्रेमाने बोलावे, समजूत काढावी हे करायचे सोडून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. एकनाथ शिंदे पक्षसंघटनेच्या स्थापनेपासूनचा सारथी आहे. त्यांची समजूत न काढता पद काढले जाते. उद्या तुमचे पद गेल्यावर तुमच्या हातात काय राहणार आहे, असा प्रश्न नारायण राणे यांनी विचारला आहे.

संजय राऊतला किती कळते काय माहिती? तो सतत खोटे बोलत असतो. शिवसेना पक्ष संजय राऊतनेच संपविला आहे. संजय राऊत खोटारडा आहे. गुजरातमधील घडामोडींवर काही सांगतो. तिथे गुजरात पोलीस आहेत ना, महाराष्ट्र पोलीस त्यांना ताब्यात घेऊ शकत नाहीत. कटकारस्थान कराल तर आम्ही काय पूजा करत बसू का? असा खणखणीत इशारा नारायण राणे यांनी यावेळी दिला आहे. ९० टक्के शिवसैनिकांच्या मी संपर्कात असतो. त्यांच्या सुखदु:खात सहभागी होतो. त्यातलाच एकनाथ हा एक आहे. आता उरलेल्या आमदारांना मातोश्रीच्या एका रूममध्ये ठेवा. आता खर्च करायला एकनाथही नसल्याचा टोमणा नारायण राणे यांनी यावेळी लगावला आहे.