सलमान खान, सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने सलमान आणि त्याच्या वडिलांची सुरक्षा कडक केली आहे. अभिनेत्याला धमकीचे पत्र मिळाल्याने पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

५ जून रोजी सलीम खान यांना सकाळी धमकीचे पत्र मिळाले होते. सकाळी ७.३० ते ८.०० वाजेच्या सुमारास सलीम यांना त्यांच्या आणि सलमानच्या नावाने हे पत्र मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

सलीम खान यांनी पोलिसांना सांगितले की, रविवारी सकाळी इतर दिवसांप्रमाणेच ते मॉर्निंग वॉक संपवून एका बाकावर बसले होते. यावेळी सलीम यांच्या अंगरक्षकाने बाकावर पडलेले पत्र पाहिले. हे धमकीचे पत्र असल्याचे सलीम यांना लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना संपर्क साधला.

मिळालेल्या माहितीनुसार, या पत्रात सलमान खान आणि सलीम खान यांना पंजाबी गायक सिद्धू मूसेवालासारखे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने पत्रात लिहिले आहे की, ‘सलीम खान, सलमान खान, लवकरच तुमची अवस्था सिद्धू मूसेवालासारखी होईल.’