गोपीनाथगडावर पंकजा मुंडे काय बोलणार याकडं लक्ष; मुख्यमंत्री शिवराज सिंहांची उपस्थिती

बीड : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आठवा स्मृतिदिन आज 3 जून रोजी आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम गोपीनाथ गडावर होणार आहे. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील मुंडे समर्थक गोपीनाथ गडावर येणार आहेत. कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात स्मृतिदिनाला समर्थकांना गोपीनाथ गडावर यायला मिळालं नव्हतं. आता दोन वर्षांनंतर गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंडे समर्थक गोपीनाथ गडावर येणार आहेत. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे सुद्धा गोपीनाथ गडावर येणार आहेत.  

पंकजा मुंडे यांनी काल गोपीनाथ गडावर जाऊन तयारीची पाहणी केली. काल पंकजा मुंडे म्हणाल्या की,  कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून हा कार्यक्रम घेता आला नव्हता. यावर्षी मात्र महाराष्ट्रातून लोक येणार आहेत. सकाळी कीर्तनाचा कार्यक्रम गोपीनाथ गडावर होणार आहे. यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करण्यात येणार आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की सर्व भूमिकांबाबत मी कार्यकर्त्यांसमोर बोलेल. कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे हे मला न बोलता कळतं. त्यामुळं कार्यकर्त्यांचा आणि माझा भविष्यातील प्रवास कसा असणार याचा संकल्प करणार आहोत, असंही पंकजा यांनी म्हटलं.

पंकजा मुंडे काय बोलणार?
विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजप पंकजा मुंडे यांना उमेदवारी देणार का यासंदर्भात मुंडे समर्थकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. त्यामुळेच गोपीनाथ गडावरुन पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. यापूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुकीवेळी पंकजा मुंडे यांनी भाजपकडून सगळी तयारी केली होती. मात्र ऐनवेळी पक्षाने पंकजा मुंडे यांची उमेदवारी नाकारली आणि रमेश कराड यांना उमेदवारी दिली. यामुळे पंकजा मुंडे नाराज झाल्या. गोपीनाथ गडावरुन आपली नाराजी जाहीररित्या व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा विधानपरिषद निवडणुकीची उमेदवारी पंकजा मुंडे यांना मिळणार का याविषयी उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे काय बोलणार, कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.

असे असतील कार्यक्रम!
आज सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा वाजता ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. त्यानंतर दर वेळेप्रमाणे समाजातील वंचित, पीडित घटकांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती तसेच संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे. सर्व आजी माजी आमदार, खासदार, मान्यवर नेते मंडळी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत.

गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू
3 जून 2014 रोजी गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं होतं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांना केंद्रीय मंत्री म्हणून शपथविधी झाला.