शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी संजय पवार यांचे नाव निश्चित

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवर कोल्हापूरचे शिवसेनेचे कट्टर समर्थक संजय पवार यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. संजय पवार हे कडवट समर्थक आहेत. या मावळ्याला आम्ही राज्यसभेची उमेदवारी देण्यासंबंधी निर्णय घेतला आहे. फायनल घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.

दोन्ही जागा शिवसेनच्या आहेत. दोन्ही जागांवर शिवसेना लढेल आणि दोन्ही जागांवर सेनेचे उमेदवार जिंकून येतील. कोल्हापुरचे संजय पवार गेली ३० वर्ष शिवसैनिक आहेत. कडवट सैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. पक्का मावळा आहे आणि मावळे असतात म्हणून राजे असतात, हे ही लक्षात घ्या… राजांना पक्षाचं वावडं असू नये, अशी कमेंट संजय राऊत यांनी केली.

कोल्हापूरचे संजय पवार हे शिवसेनेचे अनेक वर्ष जिल्हाप्रमुख आहेत, कडवट शिवसैनिक आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेचा विषय शिवसेनेसाठी बंद झाल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

‘संभाजीराजेंविषयी आम्हाला आदर’
संभाजीराजे छत्रपती यांच्याविषयी आम्हाला आदर आहे, त्यासाठीच सहाव्या जागेसाठी तुम्ही उमेदवार व्हा अशा प्रकारचा प्रस्ताव ठेवला, त्यांना राज्यसभेवर जायचं आहे, त्यांना अपक्ष लढायचं आहे, पण अपक्ष लढण्यासाठी 42 मतांची गरज आहे, तितकी मतं असतील तर ते राज्यसभेवर निवडून येतील अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.