देशातील पहिले ‘मधाचे गाव’ प्रकल्पाचा मांघर गावी शुभारंभ

राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही मधाचे गाव प्रकल्प राबविणार – उद्योग मंत्री सुभाष देसाई

देशातील पहिले ‘मधाचे गाव’ प्रकल्पाचा मांघर गावी शुभारंभ

सातारा ,१६ मे /प्रतिनिधी :-  मांघर येथील ‘मधाचे गाव’ प्रकल्प हा अशा प्रकारचा देशातील पहिलाच प्रकल्प असून राज्यातील इतर जिल्ह्यातदेखील असे प्रकल्प राबवण्यात येतील, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.

महाबळेश्वर तालुक्यातील मांघर हे  ‘मधाचे गाव’  म्हणून  श्री. देसाई  यांच्या उपस्थितीत आज घोषित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार मकरंद पाटील, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शु सिन्हा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप,  प्रांताधिकारी संगिता चौगुले, मध संचालनालयाचे संचालक दिग्विजय  पाटील,  ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, सरपंच यशोदा संजय जाधव आदी उपस्थित होते.

उद्योगमंत्री श्री. देसाई म्हणाले, ग्रामीण अर्थव्यवस्थेत  मधमाशी पालनाद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने  प्रकल्प मधमाशी राबवून त्याअंतर्गत मांघर या पहिल्या मधाच्या गावाचा अधिकृतपणे प्रारंभ होत आहे.  या गावातील ८० टक्के लोकांची उपजीविका ही या मधाच्या उद्योगावर अवलंबून आहे. यामुळे गावातील तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. मध हे आरोग्यासाठी लाभदायक असून पुढील पिढी सुदृढ रहावी यासाठी  जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेमधून   शालेय पोषण आहारामध्ये लहान मुलांना एक चमचा मध देण्याबाबत नियोजन करावे, अशी सूचना त्यांनी केली.

जगात मधामाशांची संख्या कमी होत चालली आहे. ती वाढविण्यावर भर द्यावा. वन विभागाने वनस्पतींची  संख्या वाढवावी, जेणेकरुन मध संकलनासाठी उपयोग होईल. हा एक शेतीपूरक व्यवसायही ठरु शकतो.  मधमाशांमुळे निसर्गातील समतोल राखला जातो. तसेच फुलांच्या परागीकरणामुळे पीक उत्पादनात वाढ होते. या संकल्पनेमुळे  बाजारात शुध्द मध उपलब्ध होईल. खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून  शेतकऱ्यांना प्रोत्साहन, प्रशिक्षण  आणि सहाय्य देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे  म्हणाल्या, पर्यटन विभागाने कृषी पर्यटन धोरणाअंतर्गत मांघर गावाची प्रसिध्दी करावी.  येथे येणाऱ्या  पर्यटकांना इथल्या मधुमक्षी पालन कशा पध्दतीने केले जाते, मधावर कशा पद्धतीची प्रक्रिया केली जाते याची माहिती त्यांना घेता येईल.  त्याच बरोबर स्थानिकांना अधिकाधिक रोजगार मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करावा.

यावेळी आमदार श्री. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी मांघर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.