शोषित, वंचितांचे कैवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतरत्न, प्रज्ञासूर्य, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानयोगी, परिवर्तनाचा अग्रदूत, सामाजिक समतेचा महानायक, महामानव, घटनाकार, बॅरिस्टर, कायदेपंडीत, विश्वरत्न, शोषितांचे, वंचितांचे कैवारी, समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र, धर्मशास्त्र, नीतीशास्त्र, शिक्षणशास्त्र, इतिहासशास्त्र आदींचे अभ्यासक, तत्वज्ञ, समाजसुधारक, राजकारणी, संपादक, महिला कामगार हक्काचे समर्थक, संविधानाचे शिल्पकार, शिक्षणतज्ञ, प्रकांड पंडित अशा कितीतरी विशेषणांनी व्यापलेले नाव म्हणजे डॉ. बाबासाहेब उर्फ भिमराव रामजी आंबेडकर. अगदी अण्णा भाऊ साठे यांच्या शब्दात सांगावयाचे झाल्यास “जग बदल घालुनि घाव, सांगून गेले मला भीमराव’’…

१४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. डॉ. बाबासाहेबांनी वंचित आणि शोषितांसाठी कार्य केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या, महिलांच्या समस्यांचा अभ्यास करुन उपाय सुचवले. त्यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रातील कार्यास विनम्र अभिवादन.

डॉ.बाबासाहेबांनी तमाम वंचित आणि शोषितांसाठी कार्य केले. खास करुन शेतकरी, शेतमजूरआणि महिलांच्या समस्यांची विशेष चिकित्सा करुन त्यावर उपाय सुचवले. शेतकऱ्यांचे कमालीचे शोषण करणारी खोती पद्धत कोकणात अस्तित्वात होती. खोती पद्धतीचे प्राबल्य नष्ट करण्यासाठी बाबासाहेबांनी लढा दिला. ठराविक कालावधीच्या अंतराने येणारा दुष्काळ हे शेतकऱ्याचे मोठे दु:ख आहे. अशा प्रसंगी शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी त्यांनी विविध योजना सुचवल्या. त्यापैकीच एक म्हणजे ‘पीक विमा योजना’. शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करावी याकरिता नद्या जोड प्रकल्प, सिंचनाचे प्रकल्प आदी महत्त्वाच्या योजना होत्या. शेतीसाठी मुबलक व स्वस्त दरात वीज उपलब्ध करुन देण्याबाबतही डॉ.बाबासाहेब आग्रही होते. त्यांनी राज्यघटनेच्या कलमानुसार शेतकऱ्यांसाठी खास लवाद निर्माण करण्याची तरतूद निर्माण केली.

डॉ.बाबासाहेबांच्या लेखनातील ताकद

डॉ.बाबासाहेबांच्या लेखनात, वाचनात व चिंतनात प्रचंड ताकद, शक्ती होती. ज्ञानसंपादनाच्या शक्तीमुळेच व्यक्ती, समाज, राज्य आणि राष्ट्र महान बनते याची त्यांना पूर्णपणे जाणीव होती. त्यांनी आपल्या लिखाणातून व कार्यातून तळागाळातील माणूस जागा केला. त्यांना आत्मसन्मान, स्वाभिमान, अस्मिता याची जाणीव करुन दिली. मानसिक गुलामगिरीतून मुक्त केले. दलित, गरीब व शोषित लोकांच्या व्यथा मांडण्यासाठी डॉ.आंबेडकरांनी  १९२० साली पहिले मराठी पाक्षिक ‘मूकनायक’ सुरु केले.

शैक्षणिक विचार

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपल्या कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. तत्कालीन समाजातील अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या घटकाला स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी डॉ.आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व समाजात सांगितले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो पिईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, असे ते सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असेही ते म्हणत. समाजाच्या सर्व स्तरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षणाने व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होते. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो.

प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी सांगितली. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय व्हावीत. मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे असे ते नेहमी म्हणत.

दरवर्षी भारतरत्न डॉ. आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. परंतु, गेल्या दोन वर्षापासून ‘कोरोना’ विषाणूचा सामना करत असताना सर्वच उत्सव घरातल्या घरात साधेपणाने साजरे करावे लागले. आता ‘कोव्हिड-१९’ रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे जयंतीदिनी अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाची वाढ पुन्हा होऊ नये म्हणून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे व स्वत:ही काळजी घ्यावी.
सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संविधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती राज्यभरात ६ एप्रिल पासून दहा दिवस साजरी करण्यात येत आहे. सामाजिक न्याय व विशेषसहाय विभागाच्या नियोजनानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्यावतीने ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम’ १६ एप्रिल पर्यंत राबविण्यात येईल.

– डॉ.राजू पाटोदकर

उपसंचालक (माहिती), पुणे विभाग, पुणे