भाजपला सोडलं म्हणजे ‘ते’ सोडलं असं नाही,फडणवीसांना उद्धव ठाकरेंचं उत्तर

मुंबई ,१० एप्रिल /प्रतिनिधी :-  शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडून राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणली. मात्र, ही युती तोडण्यासाठी कोण जबाबदार आहे? 2014 ला युती तुम्ही तोडली. एकनाथ खडसे यांचा फोन आला.. आपण वेगळे लढलं पाहिजे असं सांगण्यात आलं. सुरवात कुणी केली? अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

कोव्हिड काळात मुंबईमध्ये एकही काम विदाऊट टेंडर  केलं नाही. मोदींनी रेशन दिलं हे खरं आहे. पण, हे रेशन कच्च खायचं का? गॅस किती महागला आहे. जेवण कसं शिजवायचे? आमच्या हक्काचे GST परतावा देखील देत नाहीत. राज्याच्या हितासाठी आम्ही आघाडी केली. आपत्तीचे डोंगर डोक्यावर घेवून काम करतोय. पण, आम्ही थांबलो नाही, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे. आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. काल नानांच्या प्रचाराला फडणवीस येऊन गेले. बऱ्याचदा असं होतं की, आपल्याकडे बोलण्यासाठी काही मुद्दे नसतील तर खोटे आरोप करायचे, एक भ्रम निर्माण करायचा आणि आपलं घोडं कुठे पुढे सरकतं याकडे पहायचं ही यांची एक वाईट सवय झाली आहे. कधी-कधी असा विचार येतो की, आज राम नवमी आहे प्रभू रामचंद्रांचा अवतार झालाच नसता तर यांचं राजकारण कसं झालं असतं. कुठल्या मुद्द्यावर राजकारण केलं असतं. स्वत:च्या कर्तृत्वाचं सांगण्यासारखं काहीच नाहीये यांच्याकडे… मग धार्मिक मुद्दे पुढे कर, द्वेष पसरवणारे पुढे कर हे असं काही करायचं आणि आपलं इच्छित असेल ते साध्य करायचं.

सीमा भागातील मराठीवर अन्याय अत्याचार केला जातो. त्यावेळी भगव्याच्या रक्षणासाठी किती भाजपवाले रस्त्यावर उतरले? बेळगाव महानगरपालिकेवर असणारा भगवा काढला. तिथं खोटा भगवा लावला. कर्नाटकमध्ये शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना केली. त्यावेळी भाजपवाल्यांनी काय केलं? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.

तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडंल नाही

लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरकरांनी एक छान घोषणा दिली होती. आमचं ठरलंय म्हणजे काय… जे ठरलं होतं ते त्यांनी करु दाखवलं. आमचं ठरलंय म्हणत काँग्रेस-राष्ट्रवादीने केलं होतं. कोल्हापुरातून भगवा घेऊन एक खासदार आपण दिल्लीत पाठवला. त्यानंतर काय झालं? जे आता बोंबलतायत की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. कसं काय सोडलं? तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडंल नाही, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही. तुम्ही काय हिंदुत्वाचं पेटंट घेतलेलं नाहीये असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

देशात एकच ‘हिंदुहृदयसम्राट’, बाकी बनावट; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?

‘हिंदुहृदयसम्राट’ म्हटले की आपल्या डोळ्यासमोर केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच नाव येतं. भाजपने असा बनावट ‘हिंदुहृदयसम्राट’ बनविण्याचा प्रयत्न केला. पण लोकांनीच तो डाव हाणून पाडला. भाजपने आता ‘हिंदुहृदयसम्राट’ यांच्या नावांमध्ये जनाब लावण्याचा प्रयत्न केलाय. त्यांचा नकली बुरखा फाडायलाच पाहिजे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलीय.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसैनिकांनी काही दिवसांपूर्वी पोस्टर्स झळकावून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उल्लेख ‘हिंदुहृदयसम्राट’ असा केला होता. राज ठाकरे यांनी त्याचवेळी आपल्या मनसैनिकांना ‘हिंदुहृदयसम्राट’ केवळ एकच आहेत. पुन्हा असे प्रकार करू नका असे बजावले होते.

तर, मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आघाडी सरकार यांच्यावर सडकून टीका केली होती. तसेच, हिंदुत्वाच्या मुद्यावरूनही शिवसेनेवर टीका केली होती. राज ठाकरे यांच्या भाषणाला भाजपणे समर्थन दिले तर, आघाडीच्या नेत्यांनी मनसे ही भाजपची ‘बी’ टीम असल्याचा आरोप केला होता.

भारतीय जनता पक्षाचा श्वास हिंदुत्व आणि विकास आहे. पण, शिवसेनेचं हिंदुत्व म्हणजे…

शिवसेनेचं ‘हिंदुत्व’… देवेंद्र फडणवीसांनी उलगडलं ‘हे’ रहस्य

कोल्हापूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील सगळेच 100 कोटींच्या वसुलीच्या मागे लागले आहेत, हे काय आम्हाला सुरक्षा देणार? महाराष्ट्रात सरकार नाही तर भ्रष्टाचार आहे. कोरोना काळात इंग्लिश दारुवरचा टॅक्स कमी केला मग हे बेवड्यांचे सरकार आहे का? असे सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरले नाही तर त्यासमोर स्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याचे आदेश मनसैनिकांना दिले. त्यानुसार घाटकोपर आणि कुर्ला येथे मनसैनिकांनी स्पीकरवर हनुमान चालीसापोलिसांनी त्यावर कारवाई केली यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, आघाडी सरकारला मशिदीवरील भोंगे ऐकून राग येत नाही. पण, हनुमान चालीसा ऐकून राग का येतो, असा सवाल त्यांनी केला.

मंदिरावर हनुमान चालीसा म्हटल्याने सरकारला इतका राग का येतो हे आघाडी सरकारलाच विचारा. मुंबईमध्ये एका कॅलेंडरवर ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’ असं छापून ती कॅलेंडर वाटली गेली. तेव्हाच, सेनेचं हिंदुत्व कुठं गेलं हे कळलं असा टोला फडणवीस यांनी लगावला.