आसाम आणि मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी आंतरराज्य सीमावाद सोडवण्यासाठी ऐतिहासिक करारावर केल्या स्वाक्षऱ्या

नवी दिल्‍ली,२९मार्च /प्रतिनिधी :-आसाम आणि मेघालय दरम्यान आंतरराज्यीय सीमावाद सोडवण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ऐतिहासिक करारावर  आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि  मेघालयचे मुख्यमंत्री  कोनराड के. संगमा यांनी आज नवी दिल्ली येथे  केंद्रीय गृहमंत्री   अमित शहा यांच्या उपस्थितीत  स्वाक्षरी केली. शांततापूर्ण आणि समृद्ध ईशान्य क्षेत्राच्या , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  संकल्पनेच्या पूर्ततेतील हा आणखी एक मैलाचा दगड आहे.

विवादमुक्त ईशान्येसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी बोलताना सांगितले.

आज झालेल्या  या करारामुळे  आणखी एक 50 वर्षे जुना वाद मिटणार आहे, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. अल्पावधीतच आसाम आणि मेघालय यांच्यातील वादग्रस्त 12 पैकी सहा मुद्द्यांवर तोडगा निघाला आहे आणि दोन्ही राज्यांमधील सुमारे 70 टक्के सीमा वादमुक्त झाली आहे, असे त्यांनी सांगितले. राज्यांमधील वाद मिटल्याशिवाय आणि सशस्त्र गटांनी आत्मसमर्पण केल्याशिवाय ईशान्येचा विकास शक्य नाही, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या वतीने त्यांनी दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले.