राज्याचे मंत्री नबाब मलिकांना ईडीकडून अटक,3 मार्चपर्यंत कोठडी

मुंबई ,२३ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आता अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आले आहेत. नवाब मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले होते. अखेर आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे.

 नवाब मलिक यांची जे जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना सेशन कोर्टात  हजर करण्यात आलं.

54 नंबरच्या कोर्टात नवाब मलिक यांना हजर करण्यात आलं. ईडीकडून अॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तीवाद केला. ईडीने नवाब मलिक यांच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली.

सेशन कोर्टात तब्बल अडीच तास दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद झाला. यानंतर सेशन कोर्टाने नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत म्हणजे दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

Image

नवाब मलिक यांच्यातर्फे ज्येष्ठ वकिल अॅड. अमित देसाई यांनी युक्तीवाद केला. ही घटना २००३ पूर्वीची आहे. तेव्हा PMLA कायदा अस्तित्वात नव्हता, तेव्हा कारावाई का करण्यात आली नाही असा मुद्दा अॅड. अमित देसाई यांनी उपस्थित केला. आज अचानक 20 वर्षांनी अटक करुन तपास यंत्रणा १४ दिवसांची कोठडी कशी मागू शकत, असा युक्तीवाद अॅड. अमित देसाई यांनी केला.

जेव्हा तपास यंत्रणा अटक करतात, तेव्हा अधिकार जबाबदारीने वापरणं अपेक्षित असतं, कायद्याच्या चौकटीत कारवाई केली पाहिजे, बेकायदेशी अटकेची किंमत न्यायालयीन वेळ खर्ची घालून मोजली आहे, असंही अॅड. अमित देसाई यांनी म्हटलं आहे. गेल्या तीस वर्षांपासून दाऊद या गुन्हांसाठी ओळखाल जातो, पण एफआयआर ३ फेब्रुवारीलाच नोंदवला गेला. यापैकी कोणत्याही आरोपांशी मलिक यांचा संबंध जोडणारे पुरावे नाहीत असं अॅड. अमित देसाई यांनी कोर्टात सांगतिलं.

टेरर फंडींग या शब्दावर अॅड अमित देसाई यांनी आक्षेप घेतला. उद्या दहशतवादी फंडिंग अशी ईडीला हेडवाईन करायची आहे का, असा सवालही अमित देसाई यांनी उपस्थित केला आहे. 

May be an image of ‎2 people and ‎text that says "‎Nawab Malik ملک نواب नवाब मलिक @nawabmalikncp कुछ ही देर की ख़ामोशी है फिर शोर आएगा... तुम्हारा तो सिर्फ वक़्त है हमारा दौर आएगा!! Translate Tweet 8:58 PM 23/02/22 Twitter for iPhone‎"‎‎

नवाब मलिक यांना अटक
मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अटक करण्यात आलेल्या इक्बाल कासकर यांच्या चौकशीदरम्यान मलिक यांचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर आज सकाळी ईडीचे अधिकारी मलिक यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आलं. तब्बल सात तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक अटक करण्यात आलं. 

मनी लॉण्ड्रींग प्रकरणी नवाब मलिक यांना अटक करण्यात आली असून गुन्हेगारांशी संबंधित लोकांकडून जमीन खरेदी केल्याचा ठपका नवाब मलिक यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 

नवाब मलिक यांना अटक केल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तर दुसऱ्या बाजूला राजकीय वर्तुळातून या अटकेवर विविध प्रतिक्रिया उमटत आहे. मलिकांना झालेल्या या अटकेमुळे आता राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्ष आणखी पेटणार असल्याचं दिसत आहे. 

ईडीचा ताफा आज सकाळीच मलिकांच्या घरी पोहचला. मलिकांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं.  त्यानंतर मलिकांची चौकशी करण्यात आली. ही माहिती समजताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर एकच गर्दी केली. तसेच केंद्र सरकार हे केंद्रीय तपास यंत्रणेचा सूड बुद्धीने वापर करत असल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला. 

या सर्व गदारोळादरम्यान मलिकांची चौकशी सुरुच होती. मात्र यानंतर अखेर 7-8 तासांनी ईडीने त्यांना अटक केली. विशेष बाब म्हणजे नवाब मलिक हे मंत्रीपदावर असताना अटक झालेले दुसरे मंत्री ठरले आहेत. याआधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही अटक करण्यात आली होती. 

केंद्रीय तपास यंत्रणेचा सूड बुद्धीने वापर-खासदार सुप्रियाताई सुळे

नवाब मलिक हे राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. आज सकाळी ईडीने त्यांना चौकशीसाठी नेण्याआधी कोणतीही नोटीस पाठवली नाही. मलिक यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार नवाब मलिक पारदर्शकरीत्या चौकशीला सहकार्य करतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी माध्यमांसमोर दिली. या प्रकरणावर बोलताना सुप्रियाताई म्हणाल्या की, या चौकशीचे कोणतेही आश्चर्य वाटत नाही. ट्विटरद्वारे अनेक लोक अमूक-तमूक नेत्याला अटक होण्याचे धमकीवजा ट्विट करत असतात, अशी टीका देखील त्यांनी विरोधकांवर केली. केंद्र सरकारच्या सत्तेच्या विरोधात देशात जो जो विरोधक आवाज उचलतो, त्याच्यावर ईडी चौकशी अथवा अनेकवेळा नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. ज्यावेळी विरोधात कुणी बोलत असते, तेव्हाच या नोटीस आणि चौकशी होत असतात. मात्र नेत्यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर अशा नोटीसा विरघळून जातात.

या सर्व गोष्टी संसदेत मांडल्याचेही खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या. भाजपचे काही लोक ट्विटरवरून चौकशीच्या धमक्या देतात यावरही खा. सुप्रियाताईंनी भाजपवर ताशेरे ओढले. भाजपच ईडी चालवत असेल अथवा भाजप आणि ईडीचे अध्यक्ष एकच असतील किंवा भाजपाने स्वतःचा माणूस ईडी चालवायला ठेवला असावा अशी शक्यता नाकारता येणार नाही, असे खा. सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. ट्विटरचा खूप चांगला वापर हा धमक्यांसाठी भाजपा पक्ष करतो, असे सुप्रियाताई म्हणाल्या. नवाब मलिक अनेक भाजपाच्या नेत्यांचे सत्य जनतेपुढे मांडत आले आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांचा आवाज दाबण्यासाठी हा प्रयत्न होत असल्याची शक्यता आहे. नवाब मलिक या चौकशीला संपूर्ण सहकार्य करतील असा विश्वास खा. सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केला आहे.