मोदीला मारू शकतो, नाना पटोले यांचा व्हिडीओ व्हायरल!

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पंतप्रधानांना धमकी दिलेली भाजपा सहन करणार नाहीभाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा इशारा

मुंबई ,१७ जानेवारी / प्रतिनिधी :- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे भाजपला थेट अंगावर घेत आल्याचं आपण पाहतो. नाना पटोले हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून राज्यातील काँग्रेसही चांगलीच आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळत आहे. पटोले हे भाजप आणि विरोधकांवर थेट टीका करतात. मात्र, आता पटोले यांचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते मोदी यांना मारण्याची आणि शिव्या देण्याची भाषा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये ते कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिसून येत आहेत. मात्र, त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, भाजपकडूनही पटोले यांच्या या व्हिडीओवर जोरदार हल्ला चढवण्यात आलाय.

मी का भांडतो? मी आता मागील 30 वर्षापासून राजकारणात आहे. लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे…. असं आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला आणि ऐकायला मिळत आहे.

गावगुंड मोदीबाबत बोललो, पंतप्रधान मोदींबद्दल नाही

पंतप्रधानांना धमकी दिलेली भाजपा सहन करणार नाही-चंद्रकांतदादा पाटील

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून मारण्याची व शिव्या देण्याची धमकी दिली आहे, हा प्रकार भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही. भाजपाचे कार्यकर्ते जिल्ह्या जिल्ह्यात याबाबत पटोले यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करतील व पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही तर भाजपा न्यायालयात जाईल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी दिला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा ‘मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो’ अशी पंतप्रधानांना धमकी देणारा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्या संदर्भात प्रतिक्रिया देताना चंद्रकांतदादा पाटील बोलत होते.

ते म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधानांना दिलेल्या धमकीबाबत आक्रमक उत्तर द्यावे, अशी सूचना आपण सर्व जिल्हाध्यक्षांना केली आहे. पंजाबमध्ये पंतप्रधानांचा ताफा अडवून त्यांना जिवे मारण्यासाठी घातपाताचा प्रयत्न झाला. त्याला नाना पटोले नौटंकी म्हणाले होते. त्याच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. यावेळीही पोलिसांनी तसेच केले तर आम्ही न्यायालयात जाऊ.

त्यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जर तर अशा स्वरुपात एक वक्तव्य केले तर राज्यातील पोलिसांनी कारवाई केली पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पंतप्रधानांबाबत असे बोलतात आणि केंद्रीय गृहमंत्र्यांवर पंतप्रधानांच्या विरोधातील कारस्थानामागे हात असल्याचा आरोप करतात तरीही पोलीस कारवाई करत नाहीत. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर कारवाई केली तर काँग्रेस पाठिंबा काढून घेईल आणि सरकार कोसळेल यामुळे सत्तेच्या हव्यासातून कारवाई टाळली जात आहे. पण भाजपा हे सहन करणार नाही.

गावगुंड मोदीबाबत बोललो, पंतप्रधान मोदींबद्दल नाही:नाना पटोले यांचं स्पष्टीकरण  

मी गेली ३० वर्ष राजकारणात आहे. लोक ५ वर्ष राजकारण करतात आणि नंतर विसरून जातात. पण, मी राजकारणात असताना जो माझ्याकडे आला त्याला मदत केली. म्हणून मी मोदीला मारू शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो हे वक्तव्य आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे. 

नाना पटोले यांच्या या वक्त्यव्यावरून वादंग माजला. भाजपकडून याबद्दल तीव्र प्रतिक्रिया आल्या. मात्र, या प्रतिक्रिया आल्यानंतर पटोले यांनी मी गावगुंड असलेल्या मोदीबाबत बोललो आहे, पंतप्रधान मोदींबाबत नाही असे स्पष्ट केले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका करतात. पंजाब येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचे प्रकरण गाजले. यावेळीही नाना पटोले यांनी काही राज्यांमध्ये चाललेल्या निवडणुकीत स्वतः सहानुभूती मिळविण्यासाठी हा प्रकार केलाय. ठरवून दिलेल्या रस्त्यानं न जाता दुसऱ्या रस्त्याने जायचं आणि वरून आपणच कांगावा करायचा हे पंतप्रधानांना शोभत नाही. त्यांच्या पदाला शोभत नाही”, अशी टीका केली होती. 

या टीकेचे वादळ शमते न शमते तोच नाना पटोले पुन्हा अडचणीत आले आहेत. एका व्हिडीओमध्ये पटोले ‘मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो’ असं बोलत आहेत. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासह भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली.    

यावर, नाना पटोले यांनी स्पष्टीकरण देताना, आमच्या भागात मोदी नावाचा एक गावगुंड आहे. त्याची तक्रार गाववाले करत होते. त्यावेळी गाववाल्याना घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे आणि मला कुणाला घाबरण्याची गरज नाही. त्यावर ते वाक्य म्हटले आहे.