वंदे मातरम्‌ने हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ

मुंबई,२२ डिसेंबर /प्रतिनिधी:-विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास आजपासून सुरूवात झाली.  विधानसभेत वंदे मातरम्‌ने सकाळी 11 वाजता कामकाजास सुरुवात झाली. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सन्माननीय मंत्री  आणि विधानसभा सदस्य उपस्थित होते.

विधान परिषद

विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास विधान परिषदेत वंदे मातरम्‌ने आज दुपारी 12 वाजता कामकाजास सुरुवात झाली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह सन्माननीय मंत्री  आणि विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब यांनी करून दिला नवीन सदस्याचा परिचय

आजपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली. संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब यांनी नवनियुक्त विधानसभा सदस्य जितेश अंतापूरकर यांचा विधानसभेत सर्वांना परिचय करून दिला.

डॉ. प्रज्ञा सातव यांनी विधान परिषद सदस्यत्वाची घेतली शपथ

नवनिर्वाचित सदस्य डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांना विधान परिषद सदस्यत्वाची शपथ विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह सन्माननीय मंत्री आणि विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करून दिला नवीन सदस्याचा परिचय

आजपासून हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेच्या नवनियुक्त सदस्या डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांचा विधान परिषदेत सर्वांना परिचय करून दिला.

विधानपरिषद तालिका सभापतींची निवड

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी तालिका अध्यक्षांच्या नावांची विधानपरिषदेत घोषणा केली. विधान परिषद सदस्या डॉ. (श्रीमती) मनिषा कायंदे, सदस्य सर्वश्री डॉ. रणजीत पाटील, डॉ. वजाहत मिर्जा आणि श्री अमोल मिटकरी यांची तालिका अध्यक्ष म्हणून निवड केली.

दिवंगत सदस्यांना विधान परिषदेत शोक प्रस्तावाद्वारे श्रद्धांजली

दिवंगत वि.प.स., शरद नामदेव रणपिसे, माजी वि.प.स. व माजी मंत्री मखराम बंडुजी पवार, माजी वि.प.स. प्रभाकर यशवंत दातार, माजी वि.प.स. सुरेश मोरेश्वर भालेराव यांच्या दुःखद निधनाबद्दल विधान परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  शोक प्रस्ताव मांडला.

सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिवंगत शरद रणपिसे यांच्या आठवणीला उजाळा दिला. ते म्हणाले, शरद रणपिसे हे सुरुवातीला पर्वती मतदार संघातून निवडून आले होते. डाव्या विचारसरणीचा माणूस व बुद्धीस्ट विचारसरणीचा माणूस म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे अचानकपणे आपल्या मधून निघून जाणे हा माझ्यासाठी मोठा धक्का होता. सभागृहात एखादे विधेयक आल्यावर शरद रणपिसे यांच्याकडून हमखास दुरुस्ती यायची. सभागृहाची परंपरा प्रामाणिकपणे पाळणारे वेगळे व्यक्तीमत्व आपल्या मधून गेले. ही अतिशय दु:खद बाब आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माजी मंत्री मखराम बंडुजी पवार यांनी बंजारा समाजासाठी समाजकार्याबरोबर शैक्षणिक क्षेत्रात कार्य केले आहे. माजी वि.प.स. प्रभाकर यशवंत दातार यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शरद रणपिसेंना आपण सर्वजण जवळून ओळखत होतो. त्यांचे नेतृत्व अत्यंत शांत, संयमी, पुरोगामी, सुधारणावादी विचारांचे नेतृत्व होत. पण ते अजातशत्रु होते. त्यांच्या निधनाने सभागृहातील अभ्यासू संयमी नेतृत्व काळाच्या पडद्यामागे गेले आहे.

त्यांच्या प्रदीर्घकाळाचा अनुभव असलेल्या नेतृत्वाचा सभागृहातील सदस्यांना लाभ झाला. रणपिसे हे सभागृहाचे सर्व नियम, रुढी, परंपरा अवगत असलेले सदस्य होते. ते अत्यंत मृदूस्वभावाचे होते. त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान होते.

दिवंगत वि.प.स., शरद नामदेव रणपिसे, माजी वि.प.स. व माजी मंत्री मखराम बंडुजी पवार, माजी वि.प.स. प्रभाकर यशवंत दातार, माजी वि.प.स.  सुरेश मोरेश्वर भालेराव यांच्या दु:खद निधनाबद्दल शोक प्रस्तावावर बोलत असताना सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार,  विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषद सदस्य जयंत पाटील, कपिल पाटील, यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.