महाराष्ट्राची सुपूत्री देवांशी जोशीला बौध्द‍िक अक्षमता श्रेणीतील ‘रोल मॉडल’ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली,१ डिसेंबर /प्रतिनिधी:-मुळची महाराष्ट्राची सध्या दिल्लीत वास्तव्यास असलेली देवांशी जोशी ला बौध्द‍िक अक्षमता श्रेणीतील ‘रोल मॉडेल’ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.या पुरस्कारांचे वितरण 3 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहेत.

दरवर्षी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने ‘राष्ट्रीय दिव्यांग सक्षमीकरण पुरस्कार’ प्रदान केले जातात. यावर्षी 3 डिसेंबर 2021 रोजी विज्ञान भवन येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.

देवांशी ही डाउन सिंड्रोम असलेली स्वावलंबी मुलगी आहे. देवांशीचा जन्म नागपूरचा आहे. नववीपर्यंतचे तीचे शिक्षण नागपूरातील सामान्य शाळेतच झालेले आहे. ती तीच्या कर्तृत्वाने बौध्दिक अक्षमतांबद्दल असलेला समाजातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करते आहे. आठ वर्षापासून ती पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून कार्य करीत आहे.

सध्या ती दिल्लीतील वसंत कुंज येथील ब‍िग बाजारमध्ये फॅशन विभागात पूर्णवेळ कर्मचारी म्हणून आहे.  ती न्यूरो-डॉयवर्सिटी श्रेणीतील पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून काम करणारी ती प्रथम आहे. कामादरम्यान कुठल्याही विशेष सवलतीचा लाभ न घेता देवांशी पुर्ण समर्पण आणि उत्साहीपणे काम करते.  देवांशी जोशीने नेशनल ओपन स्कूल मधून 10 व 12 वी चे  शिक्षण पूर्ण केलेले आहे. तिने विविध कौशल्य प्रशिक्षणही घेतले आहे. तिच्या बहुआयामी व्यक्तीत्वाची कौतूक दखल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतलेली आहे. यापूर्वी 2016 मध्ये तीला ‘उत्कृष्ट कर्मचारी’ म्हणूनही राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.

देवांशीला  नियमितपणे ऑनलाईन, ऑफलाईन कार्यक्रमात आपल्या अनुभवाविषयी   वक्ता म्हणून सांगत असते. वर्ष 2020 मध्ये संयुक्त राष्ट्र जिनेवा येथे बोलविण्यात आले होते परंतू कोरोना महासाथीमुळे देवांशीला जाता आले नाही. यावर्षी तीने ऑनलाईन माध्यमाने आपले विचार संयुक्त राष्ट्राच्या मंचावर मांडले.

देवांशीला फोटोग्राफीचा छंद आहे. ती समाज माध्यमांवरही सक्रीय असते.  तिला देश विदेशात प्रवास करायलाही आवडतो. तिच्या या सर्व वाटचालीत तिचे वडील अनिल जोशी आणि आई रश्मी जोशी यांचे मोठे पाठबळ आहे.