वानखेडे यांच्यावर बनावट जात प्रमाणपत्र आणि पैसे वसुलीचा आरोप -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक

मुंबई ,२६ऑक्टोबर /प्रतिनिधी :-आर्यन खान प्रकरणात रोज नवे आरोप होत आहेत. या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळताना दिसत आहे. ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीची कारवाई फर्जीवाडा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिकांनी एनसीबीवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. त्याचवेळी त्यांनी ‘एनसीबी’चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा एकदा आरोप केला आहे. बनावट जात प्रमाणपत्र आणि पैसे वसुलीचा आरोप त्यांच्यावर मलिक यांनी केला आहे.  दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चेसाठी वानखेडे दिल्लीत गेल्याची माहिती समोर येत आहे. 

एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याबाबत विविध बाबी जनतेसमोर मांडत आणि पुरावे सादर करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्यांची पोलखोल केली आहे.

समीर वानखेडे यांनी धर्म बदलला नसल्याचा आणि जन्माचा दाखला खोटा असल्याचा दावा केला असला तरी त्यांनी आपला खरा जन्माचा दाखला दाखवून सत्य समोर आणावे, असे आव्हान नवाब मलिक यांनी दिले आहे. माझ्याकडे बरीच कागदपत्रे आहेत. माझ्याकडे असे पुरावे आहेत जे ते कधीही नाकारू शकत नाहीत, वानखेडे यांच्याविरोधातील इतर अनेक विषय हळूहळू समोर आणू, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

Image
Image
Image
Image

काही लोकांचा आरोप आहे की समीर वानखेडे यांच्या खासगी जीवनात हस्तक्षेप केला जातोय. मात्र खासगी जीवनात जाण्याची आपली भूमिका नसल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले. एखादा व्यक्ती धर्मांतर करून दुहेरी लाभ घेत असेल तर त्याचा उल्लेख केला पाहिजे. सत्य समोर आणण्यासाठी काही गोष्टी बाहेर येत आहेत, असे ते म्हणाले.तसेच समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांना पत्रं लिहून माझ्या मुलीचा सीडीआर मागितला. सीडीआर हा गुन्हेगारांचा मागवला जातो. सीडीआर मागवायला माझी मुलगी गुन्हेगार आहे का, असा संतप्त सवाल नवाब मलिक यांनी केला. वानखेडे आपल्या मर्यादेचा भंग करत आहेत, असे नवाब मलिक म्हणाले.