सीआयएसएफ आझादी का अमृत महोत्सव सायकल रॅलीला पुण्याच्या येरवडा कारागृह इथून प्रारंभ

पुणे ते दिल्ली 1,703 किलोमीटरच्या 27 दिवसांच्या  प्रवासादरम्यान ही रॅली स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देईल

पुणे,४ सप्टेंबर /प्रतिनिधी :-  ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ चा भाग म्हणून, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ ) देशाच्या विविध भागांमध्ये 10 सायकल रॅली आयोजित करत आहे. 2 ऑक्टोबर 2021 रोजी गांधी जयंती दिनी नवी दिल्लीतील राजघाट या महात्मा गांधींच्या समाधी स्थळी या सर्व रॅलींची सांगता होईल. देशातील तरुणांना आपल्या  स्वातंत्र्य सैनिकांच्या शौर्य कथा आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत अज्ञात नायकांनी दिलेल्या बलिदानाची ओळख करून देण्यासाठी या रॅली आयोजित केल्या जात आहेत.

10 रॅलींपैकी सर्वात लांब रॅली आज 4 सप्टेंबर 2021 रोजी पुण्याच्या येरवडा कारागृह  येथून रवाना झाली. येरवडा जेल हे असे ठिकाण आहे जिथे  गांधीजींनी उपोषण केले होते आणि ऐतिहासिक पुणे करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती.  गांधीजींना 1932 आणि 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनादरम्यान इतर अनेक स्वातंत्र्य सैनिकांसह या कारागृहात तीन वेळा ठेवण्यात आले होते.

येरवडा कारागृह, पुणे येथून रॅलीला आज पुण्याचे खासदार गिरीश बापट ,  प्रसिद्ध हॉकीपटू धनराज पिल्ले; स्वातंत्र्यसैनिक वसंत प्रसादे; सीआयएसएफचे अतिरिक्त महासंचालक अनिल कुमार; सीआयएसएफचे महानिरीक्षक के. एन. त्रिपाठी यांच्यासह सीआयएसएफचे इतर वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी, इतर मान्यवर आणि सायकल प्रेमी.यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवण्यात आला.पुणे शहरातील सर्व मान्यवर आणि सायकल प्रेमींनी या सायकलपटूंना शुभेच्छा दिल्या आणि सायकल रॅलीला भव्य निरोप दिला.

रॅलीला प्रारंभ झाल्यानंतर वाटेत या  रॅलीने पुण्यातील आगा खान पॅलेसला भेट दिली, जिथे स्वातंत्र्य लढ्यादरम्यान महात्मा गांधींना बंदिस्त करून ठेवण्यात आले होते. 8 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडोचा नारा  दिल्यानंतर  गांधीजी इथे 21 महिने राहिले होते . याच काळात महात्मा यांची पत्नी कस्तुरबा आणि त्यांचे सचिव नारायण देसाई यांचे निधन झाले.  या दोघांच्या समाधी पुण्याच्या या भव्य महालात आहेत, जो प्रसिद्ध वास्तुरचनाकार चार्ल्स कोरिया यांनी बांधला होता.

स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांचा समावेश करण्याच्या दृष्टीने सायकल रॅलीचा मार्ग आखण्यात आला आहे. येरवडा कारागृह,  पुणे  येथून सायकल रॅली सुरू झाली आणि 27 दिवसांच्या कालावधीत सुमारे 1,703 किलोमीटरचे अंतर पार करून ती दिल्लीतील  राजघाट येथे पोहचेल. सायकलिंग टीमच्या चमूत  एकूण 26 सीआयएसएफ जवानांचा समावेश आहे, ज्यात 10 सायकलस्वार आणि 16 प्रशासकीय सहाय्यक कर्मचारी, आणि दोन वाहनांचा समावेश आहे.

उद्या ही रॅली स्वातंत्र्यसैनिक राजगुरू यांचे जन्मस्थान असलेल्या राजगुरुनगरलाही भेट देईल. महाराष्ट्रातील संतवाडी, संगमनेर, नाशिकची इंडियन सिक्युरिटी प्रेस, चांदवड, आर्वी आणि शिरपूर फाटा येथून ही रॅली जाईल.

15 व्या दिवशी सायकल रॅली भोपाळला पोहोचेल. उपनिरीक्षक धीरज कुमार जेनिस यांच्या नेतृत्वाखाली सायकलस्वारांचे पथक 24 व्या दिवशी मध्य प्रदेशातील धोलपूर येथून उत्तर प्रदेशातील आग्र्याला  जाणार आहे.

राजगुरुनगर (स्वातंत्र्य सेनानी राजगुरू यांचे जन्मस्थान), मध्य प्रदेशातील भावरा (चंद्रशेखर आझाद यांचे जन्मस्थान) आणि मध्यप्रदेशातील शिवपुरी (तात्या टोपे यांचे मृत्युस्थान) या काही ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणांना रॅली भेट देईल.

कोविड संबंधी सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करत हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे.