ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा

महाराष्ट्र सायबरचे नागरिकांना आवाहन

मुंबई, दि.२१ – सध्याच्या काळात बरेच ज्येष्ठ नागरिकसुद्धा बँकांचे व्यवहार, प्रत्यक्ष बँकेत जाऊन करण्यापेक्षा इंटरनेट बँकिंगद्वारे करणे पसंत करीत आहेत. ऑनलाईन बँकिंग व्यवहार करत असताना कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

ऑनलाइन आर्थिक व्यवहार सोबतच इंटरनेटचा वापर करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत पण वाढ होत आहे. महाराष्ट्र  सायबर सर्व ज्येष्ठ नागरिकांना विनंती करते की, आपण कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. कोणत्याही अनोळखी लिंकवर तसेच कोणत्याही  संकेतस्थळावर (website) आपली व आपल्या बँक खात्यांची माहिती, डेबिट /क्रेडिट कार्डची माहिती देऊ नये.

बरेच ज्येष्ठ नागरिक सध्या फेसबुकचा वापर करायला पण शिकत आहेत व आपल्या परिचयातील जुन्या व्यक्तींना फेसबुकवर शोधून add करत आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या फेसबुक प्रोफाईलवर स्वतःची सर्व माहिती देणे टाळावे तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीची फेसबुकवर friend request स्वीकारू नये. सायबर गुन्हेगारांच्या दृष्टीने ज्येष्ठ नागरिक हे सर्वात सोपे टार्गेट असतात, त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी इंटरनेट बँकिंग व सोशल मीडिया वापरताना सावधानता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे.

तक्रार नोंदवा

जर कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाइन आर्थिक किंवा अन्य कोणत्या प्रकारे फसवणूक झाली असल्यास त्यांनी लगेच नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंद करावी, तसेच या गुन्ह्याची माहिती www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावरही (website) द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *