मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसमध्ये:२० उद्योगांशी करणार १.४० लाख कोटींचे करार

आजपासून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेला सुरुवात

दावोस : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज स्वित्झर्लंड येथील दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दुपारी १ वाजता महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. हे सुसज्ज आणि आकर्षक पॅव्हेलियन दावोस येथे प्रमुख ठिकाणी आणि भारताच्या पॅव्हेलियनसमोरच आहे. त्यानंतर काही महत्वाच्या उद्योगांसमवेत सामंजस्य करार केले जातील.

जागतिक आर्थिक परिषदेच्या न्यू इकॉनॉमी एंड सोसायटी या केंद्राचे तसेच अर्बन ट्रान्सफॉरमेशनचे प्रमुख देखील मुख्यमंत्र्यांना भेटतील. दावोसमध्ये जवळपास २० उद्योगांशी सुमारे १.४० लाख कोटींचे करार होणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेसाठी रविवारी संध्याकाळी रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्रिकेटच्या पिचवर जोरदार फटकेबाजी केली.

आज सायंकाळी ७.१५ वाजता मुख्यमंत्री हे मुख्य स्वागत समारंभासाठी काँग्रेस सेंटर येथे दाखल होतील. मंगळवारी लक्झमबर्गचे पंतप्रधान, जॉर्डनचे पंतप्रधान, सिंगापूरचे माहिती व दूरसंचार मंत्री, जपान बँक, सौदी अरबचे उद्योग व खनिकर्म मंत्री, स्विस इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी आहेत.

विविध क्षेत्रातील नामवंत उद्योगांसमवेत सामंजस्य करारही महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये करण्यात येणार आहेत. यानंतर संध्याकाळी ३.४५ वाजता मुख्यमंत्री शिंदे यांचे काँग्रेस सेंटर येथे संबोधन होणार आहे. यावेळी ते बदलत्या पर्यावरणाचे शहरांच्या विकासापुढील आव्हान आणि पर्यावरणपूरक शाश्वत विकास यावर बोलतील. रात्री ८ वाजता महाराष्ट्राच्या वतीने स्नेहभोजन आयोजित करण्यात आले असून यासाठी उद्योग, राजकीय, तसेच इतर क्षेत्रातील १०० ते १५० मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री देखील यात असतील. यावेळी खास महाराष्ट्रीय भोजनाचा बेत असेल.