‘चुका, खुलासे अन किस्से पत्रकारितेचे’ हे पुस्तक म्हणजे राजकीय, सामाजिक जीवन शिकविणारा दस्तऐवज –अजित पवार

पुणे ,२ जुलै /प्रतिनिधी :- ज्येष्ठ पत्रकार श्यामतात्या दौंडकर यांचे ‘चुका, खुलासे अन किस्से पत्रकारिते’ चे हे पुस्तक म्हणजे जनतेला, राजकीय नेत्यांना, राजकीय सामाजिक जीवन शिकविणारा दस्तऐवजच असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

‘चुका, खुलासे अन किस्से पत्रकारितेचे’ हे पुस्तक म्हणजे राजकीय, सामाजिक जीवन शिकविणारा दस्तऐवज – उपमुख्यमंत्री अजित पवार

पत्रकार श्यामतात्या दौंडकर यांच्या ‘चुका, खुलासे अन किस्से पत्रकारितेचे’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषदेच्या महात्मा गांधी सभागृहात  झाले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी जि.प. अध्यक्ष निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जि.प.चे बांधकाम  व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व पत्रकार उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ज्येष्ठ पत्रकार श्यामतात्या दौंडकर यांना गेल्या 30 ते 35 वर्ष पत्रकारिता करीत असताना आलेले अनुभव ‘चुका, खुलासे अन किस्से पत्रकारितेचे’ या पुस्तकातून त्यांनी व्यक्त केले आहेत. पुस्तकाची पहिली आवृत्ती अवघ्या चार महिन्यातच संपली. यावरुन या पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित होते. जिल्ह्याच्या, राज्याच्या राजकारणातील गमतीदार किस्से या पुस्तकात त्यांनी नमूद केलेले आहेत. पत्रकारांबद्दलचे अनेक गैरसमज या पुस्तकातून दूर होतील. पुस्तक हे अतिशय सोप्या भाषेत लिहिलेले आहे. त्यामुळे सामान्य लोकांना लगेच समजते. गेल्या 30 ते 35 वर्षात श्यामतात्यांना राजकीय सामाजिक जीवनात जे-जे लोक भेटले, मित्र, परिवार त्यांचेही योगदान या पुस्तकात आहे.

एका सामान्य ग्रामीण शेतकरी कुटुंबातून आलेला तरुण सामान्य जनता, वाचक यांच्या समस्या प्रश्न घेऊन पत्रकारितेत आपलं स्थान निर्माण करतो. अशा श्यामतात्या दौंडकर यांच्या या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीलाही माझ्या मनापासून शुभेच्छा! वाचकांनी पहिल्या आवृत्तीप्रमाणेच दुसऱ्या आवृत्तीलाही प्रतिसाद द्यावा, असेही आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.