कोरोना – कोई रोएगा नही !

मंदाकिनी पाटील/पुणे

रात्रीचे साडे तीन वाजलेले. स्मशानामध्ये भयाण शांतता.. शेजारच्या काकूच्या अंतिम संस्कार करिता मी गेलेले… स्मशानभूमीत जाण्याची ही काही माझी पहिलीच वेळ नव्हती पण अशा मध्यरात्री स्मशानात जाण्याची ही पहिलीच वेळ. मन खूप अस्वस्थ होतं. तिथे आमच्या व्यतिरिक्त इतरही बरेच लोकं होती. कोरोनामुळे गेलेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी ताटकळणारी. आपण नेहमीच बघतो की आपल्या जवळची व्यक्ती गेली की एक आक्रोश असतो, रडणे असते, पण तेव्हा स्मशानात मी फक्त शांतता आणि थिजलेलं एक भलं मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित प्रत्येकाच्या नजरेत बघितलं. आता अंतिम संस्कार करायला पण नंबर लावावा लागतो. सर्वांची नजर अंतिम संस्कार करायला आपला नंबर केव्हा येईल याकडे. ज्या डोळ्यामध्ये आपली व्यक्ती गेली, त्याकरिता अश्रू असायला हवेत. मात्र ती डोळे थिजलेले आणि भावनाशुन्य होती. एक प्रश्न चिन्ह दिसत होते. तिथे रडण्याकरिता  सुद्धा आप्तेष्टांना वेळ नव्हता? सर्वांच्या चेहऱ्यावर दुःखापेक्षा मला प्रश्नचिन्ह दिसत होते. त्या रात्री मी जे अनुभवले त्यावरून असे लक्षात आले की महामारी आपल्याला किती गोष्टी शिकवून जात आहे. आपण जन्मापासून मृत्यू पर्यंत भौतिक गोष्टी मिळवण्या करिता धडपड करतो. सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या प्रयत्न करीत असतो. पण खरंच आपण गेल्याने संपतात का जबाबदाऱ्या किंवा जीवनचक्र थांबते का? मला तिथे भा.रा. तांबे यांची कविता आठवली,

Displaying IMG-20210524-WA0006.jpg

“जन पळभर म्हणतिल हाय हाय,

मी जाता राहील कार्य काय,

सूर्य तळपतील ,चंद्र झळकतील,

तारे अपुला क्रम आचारतील,

असेच वारे पुढे वाहतील,

होईल का काही अंतराय,

मी जाता राहील कार्य काय।”

जर माझ्या जाण्याने कोणतेही कार्य जर थांबत नसतील, जीवन चक्र थांबत नसेल, तर माझी धडपड ही कशासाठी? माझ्या डोक्यात प्रश्नांचे काहूर माजले होते. शांतता फक्त स्मशानातच आहे का? तर नाही शांतता प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आयुष्यभर आपण फक्त जबाबदाऱ्या पार पाडत असतो. स्वतःचे आयुष्य जगायचे राहुनच गेलेले असते. खुप असह्य होत होते. मला या महामारी ने सर्वांचे आयुष्य बदलून टाकले. मनाला असह्य करणारी ती रात्र होती माझ्यासाठी. जीवनाच्या या रंग मंचावर अनपेक्षीतपणे आगमन होताच वेगवेगळ्या भूमिका वठवता वठवता त्या पात्राचा कधी शेवट होतो, हे त्या कलाकाराला सुद्धा कळत नाही. आणि उरतात फक्त आठवणी.. मनुष्य जन्माला आल्यानंतर ‘स्व:’ च्या अस्तित्वासाठी आणि स्वतःच्या साम्राज्य साठी धडपड करत असतो. पद, पैसा, प्रतिष्ठेच्या आभासी दुनियेत तरंगायला लागतो. वास्तविक नाचणारा मोर आणि पैशांचा जोर फार काळ टिकत नाही म्हणतात. त्याचा त्याचा काळ संपला की मग पिसारा आणि पसारा आवरायला खूप कठीण जातो. खरं तर एक ना एक दिवस या मायावी जगाचा मला निरोप घ्यायचा आहे. एक दिवस हे जग सोडून आपण जाणारच आहोत. याची कल्पना असून पण मनुष्य असा जगतो की जणू काही तो अमर पट्टा घालून आला आहे. जगण्याची ही नशा वृद्ध काळापर्यंत कमी कमी होत जाते. आणि मग तेव्हा मर्म कळायला लागतो. पण काळ शिल्लक नसतो. तिथे माझ्या मनात एक विचार आला.. जर मला माहित आहे, मी मरणार आहे आणि जर मृत्यू हे अंतिम सत्य आहे, तर जे आयुष्य आपल्या हातात आहे, ते का नाही आनंदाने जगायचे? आपण बघतो गेल्या वर्षभरापासून शाळा, कॉलेज, ऑफिस, दुकान सर्व बंद बंद आहे. कोणताही गुन्हा न करता !! आपण सारेच जेल बंद आहोत. थोड्या वेगळ्या प्रकारच्या जेलमध्ये! यामुळे लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्वांचे मानसिक संतुलन ढासळत चालले आहे. सर्वांचे जीवन विस्कळीत झाली आहे. आर्थिक बजेट कोसळलाय, मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली आहे, मनुष्य हानी झाली आहे. कोणाचे तर अवघ्या कुटुंबाच्या कुटुंब महामारी मध्ये मृत्यू पावले. मुलांचे शालेय शिक्षण वर्षभरापासून स्थिरावलेले. ती मुलं घरात राहून Electronic माध्यमाच्या च्या आहारी गेली. तरुण वर्ग त्यांचे कॉलेज बंद मुळे मित्र मैत्रिणीसोबत मनसोक्त गप्पा मस्ती सर्वकाही त्यांच्यापासून हिरावले गेले आहे. त्यामुळेही त्यांचा संवाद ती मस्ती कॉलेज, करिअर सर्व गोष्टी ऑनलाइन वर येऊन ठेपले आहेत. स्त्रियांना दिवसभर घरातील काम, पुरुषांना ऑफिस वर्क, महामारी मुळे आपण शरीराने एकत्र आलो आहोत घरात खरे पण मनाने दुरावलेले आहोत.  कारण आपल्या जीवनात नवीन काहीच घडत नाही. जेणे करून आपण संवाद साधून एकमेकांना नीट उमजून घेऊ. त्या वेळेस माझ्या डोळ्या समोर एक कल्पना आली की आपल्या सर्वांमध्ये एक सुप्त गुण आहे. बऱ्याच लोकांना काही परिस्थितीमुळे किंवा जबाबदाऱ्यांमुळे आपल्या गुणांना न्याय देता आला नाही. कुणाला गायनाची आवड आहे, कुणाला कुकिंग तर कुणाला नाचण्याची, तर कुणाला लेखनाची, कुणाला फिरायची, तर कुणाला कविता करण्याची.. प्रत्येकामध्ये एक कला गुण आहे, आपण लॉकडाउन ला एक  संधी म्हणून बघितले तर आपल्याकडे वेळ आहे. आपल्या कला गुणांना वेळ दयायला. आपल्या गुणांना वेळ देऊन शिकायला काय हरकत आहे? घरी बसल्या बसल्या युट्युब वर सर्व प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत. ऑनलाईन क्लासेस उपलब्ध आहेत. आपण ऑनलाईन शिकून एकमेकांना शेअर केले तर प्रत्येकाच्या कलागुणांना वाव मिळेल, नवीन व्यक्ती सोबत सवांद होईल, नवीन ओळखी होतील, संवाद वाढल्याने तुमच्या जीवनात नवीन गोष्टी घडतील, नैराश्‍य कमी होईल. काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील. यामधून *यू नेवर नो !* तुम्हाला एखादी छान संधी मिळेल.
 वरिष्ठ गझलकार सदानंद डबीर यांची कविता मनाला प्रेरणा देऊन जाते.

“आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे.

रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे.

अश्रूच यार माझा मदिरे समान आहे,

काट्यातही फुलांची झुलती कमान आहे.

उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे.

जगणे निरर्थक म्हणतो, तो बेइमान आहे

सुखासाठी कधी हसावं लागतं, कधी रडावं लागतं,

कारण सुंदर धबधबा बनायला, पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं !
 मग आपण ही संधी का नाही घ्यावी? आणि यातून जर काही चांगले बदल घडवू शकत असू तर काय हरकत आहे?  *”जर परिस्थिती आपण बदलू शकत नसू, तर मनस्थिती बदलायला काय हरकत आहे?”* सुरुवात महत्वाची. कारण उगम एका लहानशा झऱ्यातून होणारा पाण्याचा प्रवाहच पुढे विशाल नदीचे रुप घेतो. आपण एक whatsapp ग्रुप बनवूयात..

*मै अकेला ही चला था मंजिले जनाब, लोग मिलते गये और कारवा बढता गया..* याप्रमाणे समान विचारधारा असलेले मित्र जुळत जातील. म्हणून सुरुवात महत्वाची ! वेगवेगळे विशिष्ट उद्देश घेऊन व्हाट्सएप ग्रुप बनवून  या ग्रुप मध्ये सर्व वयाच्या लोकांनी एकत्रित येऊन आपल्या सुप्तगुणांना वाव देऊयात. यामुळे संवाद वाढेल, विचारांची देवाण-घेवाण वाढेल आणि नैराश्‍य कमी होईल. माझी स्वतःची एनजीओ आहे. आम्ही त्यामाध्यमातून पण मदत करीत आहोत. मी बऱ्याच सोशल व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन आहे. रात्री-अपरात्री फोन येतात मदतीकरिता, फोनवर त्याचे रडणे, व्हेंटिलेटर मिळविण्याकरिता धडपड, मेडिसिन करिता धडपड, त्याकरिता त्यांची मदतीची हाक, ते ऐकून मन  अस्वस्थ होते, डोकं सुन्न होते.. त्यांना पुर्ण मदत करण्याचा माझा प्रयत्न असतोच. मी मला शक्य होईल तितकीच मदत करू शकते. एका व्यक्तीला मर्यादा असतात पण समूहाला नसतात. समुहाचे – एकीचे बळ असाध्य गोष्ट सुद्धा साध्य करू शकते.  पण त्या रात्री माझ्या मनामध्ये हा विचार आला की, आपण या लोकांना नैराश्य मधून कसं बाहेर काढू शकतो, तेव्हा ही कल्पना माझ्या डोक्यामध्ये आली. आज अधिकारीवर्ग असू देत का कंपनीमध्ये काम करणारे व्यक्ती व घरात काम करणारी गृहिणी, शाळेत जाणारे विद्यार्थी व तरूण पिढी, व्यापारी वर्ग. सर्वजण मानसिक तणावाखाली जगत आहेत. या महामारी च्या काळात आपण एकमेकांना धीर देऊन यातून नवनवीन संकल्पना करूयात या नैराश्ये मधून स्वतःला बाहेर काढूयात. मी कोणी लेखिका नाही. त्या रात्री स्मशानात माझ्या डोक्यात आलेले विचार मी आपल्या पर्यंत पोचवीत आहे.