महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, महापुरूषांचा अवमान… कसा होता हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस?

नागपूर ,१९ डिसेंबर/ प्रतिनिधी :-नागपूरमध्ये आज हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी अधिवेशनाची सुरुवात ही अपेक्षितपणे वादळी झाली. विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला अनेक मुद्द्यांवरून घेरण्याचा प्रयत्न केला. पहिल्या दिवशी विरोधकांनी महाराष्ट्रातील महापुरुषांचा होणारा अवमान, तर महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरून टीका केली. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच गदारोळ झाला आणि कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून शिंदे गटाने सुषमा अंधारे यांच्याविरोधात घोषणा दिल्या. त्यांनी काही दिवसांपूर्वी संतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर वारकरी संप्रदायाकडून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. तसेच, अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांविरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली. तसेच, विधानभवनातील शिवसेना कार्यालय कोणत्या गटाकडे जाणार? हा सर्वात महत्त्वाचा मुद्दाही उचलण्यात आला. तर, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेननंतर पहिल्यांदाच विधान भवन परिसरात शाईचे पेन घेऊन जाण्यास प्रतिंबध घालण्यात आला. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही खबरदारीचा उपाय म्हणून शाई पेनवर बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रशनावरून महाराष्ट्राच्या एकसंघतेला तडा जाण्याचे काम होत आहे. यावर दिल्ली येथे झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या सुचनेमध्ये दोन्ही राज्यांनी काळजी घेण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्र्यांकडून करण्यात आली.

असे असताना आज कर्नाटक दिन असताना बेळगाव भागात आज जो मराठी भाषिकांचा कार्यक्रम होणार होता त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळे दिल्लीत झालेल्या बैठकीत सूचना देऊनही कर्नाटक अशी भूमिका घेत असेल तर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राची संपूर्ण जनता या सीमा भागातील मराठी भाषिकांच्या मागे आहे ही भूमिका स्पष्ट करून महाराष्ट्राच्या एकजुटीचा संदेश द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी विधानपरिषदेत केली.

राज्यात सत्ताधाऱ्यांकडून किंबहुना जबाबदार व्यक्तींकडून सातत्याने महापुरुषांचा कळत नकळत होणारा अपमान थांबविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहितदादा पवार यांनी पुढाकार घेतला. राज्याच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपूर येथील विधान भवनच्या आवारात सर्व लोकप्रतिनिधींना महापुरुषांची संपूर्ण माहिती अवगत होण्यासाठी महापुरुषांच्या माहितीच्या सहा पुस्तकांचे वाटप केले.