साखर कारखान्यांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी; नाशिक सहकारी साखर कारखाना सुरु झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक, २१ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- सहकारी साखर कारखाने सुरु होणे शेतकरी व सभासदांसाठी आनंदाची बाब आहे. साखर कारखाने सुरु झाल्याने शेतकरी, सभासद, आजुबाजुच्या परिसरात एक समृद्धी व परिवर्तनाचे चित्र निर्माण होऊन कठीण काळातही आर्थिक आधार देत साखर कारखाने कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात. त्यामुळे निश्चितच नाशिक सहकारी साखर कारखाना सुरु झाल्याने शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने दिवाळी गोड झाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

नाशिक सहकारी साखर कारखाना (नासाका) लि. पळसे संचलित मे.दीपक बिल्डर्स अण्ड डेव्हलपर्स 2022-23 च्या गळीत हंगामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री तरुण राठी, खासदार व कारखान्याचे चेअरमन हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, देवयानी फरांदे, किशोर दराडे, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष हरगिरी महाराज, जिल्हाधिकारी गंगाथरन.डी, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत पलकुंडवर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, निलेश श्रींगी, कारखान्याचे कार्यकारी संचालक सुकदेव शेटे व सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, उसाच्या एकूण उत्पादन खर्चावर राज्यात एकूण 98 टक्के रास्त व किफायतशीर दर देण्यात आला आहे. यंदाच्या हंगामासाठी ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले असून सरासरी 95 टन प्रति हेक्टर ऊस उत्पादन अपेक्षित आहे. तसेच या हंगामात 203 कारखाने सुरु होऊन 138 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर साखरेचे उत्पादन झाले असून आपण उत्तर प्रदेशलाही मागे टाकले आहे. देशात 60 लाख मेट्रीक टन साखरेचा साठा असून त्यापैकी 30 लाख मेट्रीक टन साखर महाराष्ट्रात आहे. भारतातून 100 लाख मेट्रीक टन साखर निर्यात होणार असल्याचा अंदाज असून त्यात महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा 60 लाख मेट्रीक टन होण्याची शक्यता आहे,असे श्री शिंदे यांनी सांगितले.

शासन सदैव शेतकरी,कष्टकरी, वारकरी, सर्वसामान्यांचा पाठीशी आहे. गेल्या तीन महिन्यात 72 मोठे निर्णय व चारशे शासन निर्णय पारित करुन त्यावर अंमलबजावणी देखील शासन करत आहे. सततच्या व परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे एनडीआरफच्या निकषात बदल करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत मदत कशी होईल यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सर्वसामान्यापर्यंत दिवाळीचा शिधा पोहचेल यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच योग्य ते नियोजन करुन कुंभमेळा यशस्वी करण्यात येईल, असेही यावेळी श्री शिंदे यांनी सांगितले .

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर कारखाना सुरु करून शेतकऱ्यांना दिलासा: राधाकृष्ण विखे पाटील

गेल्या नऊ वर्षांपासून बंद असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सुरू करून या परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथेनॉल प्रकल्पाला तत्वतः मंजुरी देऊन साखर उद्योगाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला आहे. सहकारी सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही अभ्यास गट तयार करण्यात यावा, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

नाशिक सहकारी साखर कारखाना सुरु करुन शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच गळीत हंगाम यशस्वी होऊन शेतकऱ्यांना व कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, असे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

कार्यक्रमात यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऊस उत्पादन मिशन एकरी 125 मे.टन पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.