मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी!

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला मोठा धोका असून त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यामुळे पोलिस सतर्क झाले असून या संबंधी तपास सुरू आहे. या घटनेनंतर, मुख्यमंत्र्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येणार असून तशा प्रकारच्या सूचना मुंबई पोलिसांनी दिल्या आहेत.

महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर एक निनावी फोन देखील धमकीचा आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आधीच माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती.

यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी “एकनाथ शिंदे यांचे हिंदुत्ववादी सरकार ज्या दिवसापासून राज्यात आले आहे तेव्हापासून अनेकांच्या पोटात दुखत असून त्या लोकांना अशा प्रकारची टोकाची भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. पण अशा प्रकारची प्रवृत्ती आता ठेचून काढली जाईल. याच्या मुळाशी कोण आहे याचा तपास केला जाईल.”अशा शब्दात इशारा दिला आहे.