नुपूर शर्माला फाशी द्या- इम्तियाज जलील

औरंगाबाद ,१० जून /प्रतिनिधी :- भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीचे पडसात देशासह राज्यातही उमटलेत. एआयएमआयएम पक्षाचे औरंगाबदचे खासदार इम्तियाज जलील यांनी थेट नुपूर शर्मा यांना फाशी देण्याची मागणी केली.

Image

काही दिवसांपूर्वी एका टीव्ही डीबेटमध्ये डॉ. सस्लिम रहमानी यांनी वारंवार चिथावणी दिल्यामुळे भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर ३ जून रोजी कानपूर येथे नुपूरच्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीवरून हिंसाचार झाला. या घटनेचे परदेशातही पडसाद उमटून मुस्लीम देशांकडून निषेध नोंदवण्यात आला. याप्रकरणी भाजपने तत्काळ कारवाई करत नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांना पक्षातून काढून टाकले. तसेच नुपूर आणि नवीन यांच्यासह वेळोवेळी विविध धर्मांवर आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या ३० जणांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यामध्ये एआयएमआयएमचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवैसी यांचाही समावेश आहे.

यापार्श्वभूमीवर शुक्रवारच्या नमाजनंतर आंदोलन करू नये असे आवाहन दिल्लीतील जामा मशिदीच्या शाही इमामांनी केले होते. परंतु, त्यानंतरही आज, शुक्रवारच्या नमाजनंतर जामा मशिदीबाहेर आंदोलन करण्यात आले. दिल्लीसोबतच लखनऊ, प्रयागराज, सहारणपूर इत्यादी शहरांमध्येही मुस्लिमांनी नुपूर आणि नवीन यांच्या विरोधात आंदोलन करत त्यांच्या अटकेची मागणी केली. यासोबतच महाराष्ट्रातील सोलापूर, औरंगाबद आणि मुस्लीम बहुल शहरांमध्ये देखील निषेध मोर्चे काढण्यात आले.

यासंदर्भात औरंगाबदचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, नुपूर शर्मा यांची पक्षातून हकालपट्टी करणे आणि त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवणे ही दिखाव्याची कारवाई आहे. नवीन जिंदल आणि नुपूर शर्मा यांच्यावर पोलिस, प्रशासन काहीच कारवाई करीत नाही. इतरांना मात्र छोट्या गोष्टींसाठी देखील तुरुंगात डांबले जाते. एकीकडे शांततेचे आवाहन करतानाच केंद्र सरकारने नुपूर शर्माला फाशी द्यावी अशी मागणी देखील जलील यांनी केलीय.