दिवाळीसाठीच्या ‘आनंदाचा शिधा’ वितरणाचा शुभारंभ

मुंबई ,२० ऑक्टोबर /प्रतिनिधी :- दिवाळी निमित्ताने राज्यातील सुमारे ७ कोटी नागरिकांना देण्यात येणाऱ्या ‘आनंदाचा शिधा’ या माध्यमातून चार वस्तूंच्या वितरणाचा शुभारंभ अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला. काळाचौकी, घोडपदेव येथील रेशनिंग दुकानातील पात्र शिधापत्रिकाधारकांना चार जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले की, राज्यातील गरिबांची दिवाळी गोड करण्याच्या दृष्टीकोनातून सरकारने पहिल्यांदाच हे पाऊल उचलले. चांगल्या प्रतीचा १ किलो रवा, १ किलो चणा डाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल स्वस्त दरात 100 रुपयांमध्ये सर्वांना मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हे पाऊल उचलले आहे. आज महाराष्ट्रातील सर्व रेशनिंग दुकांनावर या चारही जीवनावश्यक वस्तू पोहचल्या आहेत. असेही श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

दिवाळीनिमित्त शासनाच्या माध्यमातून राज्यातील पात्र शिधा पत्रिकाधारकांना आगामी काळामध्ये प्राधान्य कुटूंबातील शिधा पत्रिकाधारकांना, अंत्योदय अन्न योजनेतील सुमारे 1 कोटी 62 लाख पात्र लाभार्थींना याचा लाभ मिळणार आहे.