महत्त्वाची शीख धर्मस्थळांची जोडणी सुधारणार, वैष्णोदेवीला पोहोचणे देखील अधिक सुलभ होणार

42750 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांची कोनशीला पंतप्रधान ठेवणार

अमृतसर-उना टप्प्याचे चौपदरीकरण होणार: चार मुख्य राष्ट्रीय महामार्गांशी हा टप्पा जोडला जाणार

धोरणात्मक मुकेरीयन-तलवारा नव्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या कामाची कोनशीला रचली जाणार

नवी दिल्ली,३ जानेवारी/प्रतिनिधी:-

पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 जानेवारी 2022 रोजी पंजाबमधील फिरोजपूर येथे भेट देणार आहेत आणि दुपारी 1 वाजता तेथील 42,750 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची कोनशीला ठेवणार आहेत. या प्रकल्पांमध्ये दिल्ली-अमृतसर-कटरा द्रुतगती महामार्ग, अमृतसर-उना टप्प्याचे चौपदरीकरण, मुकेरीयन-तलवारा दरम्यान नवा ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, फिरोजपूर येथे पीजीआय सॅटेलाईट केंद्र  उभारणी तसेच कपूरथला आणि होशियारपूर यथे दोन वैद्यकीय विद्यापीठांची स्थापना करण्याच्या प्रकल्पांचा समावेश आहे.

देशाच्या सर्व भागांमध्ये संपर्क सुविधा सुधारण्याच्या पंतप्रधानांच्या अखंडीत प्रयत्नांमुळे पंजाबमध्ये विविध राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. परिणामी, पंजाब राज्यात 2014 साली 1700 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते त्यात दुपटीने वाढ होऊन 2021 साली राज्यात 4100 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग निर्माण झाले आहेत. याच प्रयत्नांचा पुढील भाग म्हणून, पंजाबमधील दोन प्रमुख रस्ते मार्गिकांच्या कामाची कोनशीला ठेवली जाणार आहे. या कामांमुळे, पंजाबमधील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर पोहोचण्याच्या सुलभतेत वाढ करण्याची पंतप्रधानांची संकल्पना प्रत्यक्षात येण्यास मदत होईल.   

एकूण 669 किलोमीटर लांबीच्या दिल्ली-अमृतसर-कटरा मार्गाच्या विकासासाठी सुमारे 39,500 कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्रकल्पामुळे दिल्ली ते अमृतसर आणि दिल्ली ते कटरा या मार्गांच्या प्रवासांचा वेळ निम्मा होईल. ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गामुळे पंजाबमधील सुलतानपूर लोधी, गोइंदवाल साहिब,खदूर साहिब,तरण तारण ही महत्त्वाची शीख धर्मस्थळे आणि हिंदू धर्मियांचे कटरा येथील वैष्णोदेवी देवी हे पवित्र धार्मिक स्थळ ही एकमेकांशी जोडले जातील. हा द्रुतगती महामार्ग, हरियाणा, चंदीगड, पंजाब आणि जम्मू-काश्मीर या राज्यांतील अंबाला, चंदीगड, मोहाली, संगरुर,पतियाळा, लुधियाना. जालंधर, कापूरथळा, कथुआ आणि सांबा यासारखी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची केंद्रे जोडली जातील.  

सुमारे 1700 कोटी रुपये खर्च करुन, अमृतसर- उना भागातील रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. 77 किमी लांब पट्टा हा अमृतसर ते भोटा दरम्यानचा असून उत्तर पंजाब आणि हिमाचल प्रदेशादरम्यानच्या या मोठ्या पट्ट्यात असलेला हा पट्टा, अमृतसर-भटिंडा-जामनगर इकॉनॉमिक कॉरिडॉर, दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेसवे, उत्तर-अमृतसर-कत्रा एक्सप्रेसवे आणि दक्षिण कॉरिडॉर आणि कांगडा-हमीरपूर-बिलासपूर-शिमला कॉरिडॉर या चार प्रमुख राष्ट्रीय महामार्गांना जोडतो. या मार्गामुळे, घोमन, श्री हरगोबिंदपूर आणि पुलपुक्ता टाउन (जिथे सुप्रसिद्ध पुलपुक्ता साहिब गुरुद्वारा आहे.) अशा तीर्थक्षेत्रांपर्यंत जाण्याचा मार्गही सुकर होणार आहे.

410 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून बांधण्यात येणाऱ्या सुमारे 27 किलोमीटर लांबीच्या मुकेरियन ते तलवाडा दरम्यानच्या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत. हा रेल्वे मार्ग, नांगल धरण-दौलतपूर चौक रेल्वे विभागाचा विस्तार असेल. या रेल्वेमार्गामुळे, या परिसरात वाहतुकीचे बारमाही साधन उपलब्ध होईल. हा प्रकल्प सामरिकदृष्ट्या देखील महत्त्वाचा आहे कारण यामुळे जम्मू आणि काश्मीरसाठी एक पर्यायी मार्ग देखील उपलब्ध होईल. सध्या असलेल्या जालंधर-जम्मू रेल्वे मार्गाला मुकेरियन इथे हा विस्तारीत मार्ग जोडला जाईल. पंजाबमधील होशियारपूर आणि हिमाचल प्रदेशातील उना इथल्या लोकांसाठी हा प्रकल्प विशेषतः फायदेशीर ठरेल. या मार्गामुळे, या प्रदेशातील पर्यटनाला चालना मिळेल तसेच हिल स्टेशन्स तसेच तीर्थक्षेत्रांपर्यंतची वाहतूक सुलभ होईल.

देशाच्या सर्व भागात, जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा पोहोचवण्याच्या पंतप्रधानांच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पंजाबमधल्या तीन गावांमध्ये बांधल्या जाणाऱ्या नव्या वैद्यकीय पायाभूत सुविधांची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते केली जाईल. 490 कोटी रुपये खर्च करुन, फिरोजपूर इथे 100 खाटांचे पीजीआय उपकेंद्र बांधले जाणार आहे. या उपकेंद्रात, 10 अंतर्गत वैद्यकीय सुविधा, सामान्य शस्त्रक्रिया, अस्थिरोग उपचार, प्लॅस्टिक सर्जरी, मज्जासंस्था शस्त्रक्रिया, स्त्रीरोगचिकित्सा, बालरुग्ण सेवा, नेत्ररुग्णालय, कान-नाक-घसा तज्ञ, मानसोपचार आणि नशामुक्ती केंद्र अशा सुविधा उपलब्ध असतील. या उपकेंद्रामुळे फिरोजपूर आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील.

कपूरथला आणि होशियारपूर येथे सुमारे 325 कोटी रुपये खर्चून आणि सुमारे 100 जागांची क्षमता असलेली दोन वैद्यकीय महाविद्यालये विकसित केली जातील. या महाविद्यालयांना केंद्र पुरस्कृत योजनेच्या ‘जिल्हा रुग्णालय/ रेफरल हॉस्पिटल्सशी संलग्न नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना’ या फेज-III मध्ये मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पंजाबसाठी एकूण तीन वैद्यकीय महाविद्यालयांना मंजूरी देण्यात आली आहे. फेज-1 मधील एसएएस नगर येथे मंजूर झालेले महाविद्यालय, आधीच सुरु झाले आहे.