राम मंदिर हे आपली संस्कृती, शाश्वत श्रद्धा, राष्ट्रीय भावना आणि सामुहिक इच्छाशक्तीचे आधुनिक प्रतीक: पंतप्रधान

पंतप्रधानांच्या हस्ते ‘श्रीराम जन्मभूमी मंदिराचे’ भूमीपूजन
‘सबका साथ’ आणि ‘सबका विश्वास’ या माध्यमातून आपण ‘सबका विकास’ साध्य करावा
मंदिर उभारणीनंतर प्रदेशाची अर्थव्यवस्था बदलेल: पंतप्रधान
राममंदिराचे स्वप्न साकार करण्यासाठी ज्यांनी संघर्ष केला, त्या सर्वांचे पंतप्रधानांकडून स्मरण आणि त्यांना अभिवादन
श्रीराम म्हणजे देशाच्या विविधतेतील एकतेचा समान धागा : पंतप्रधान
सध्याच्या कोविड परिस्थितीतील ‘मर्यादा’ म्हणजे ‘दो गज की दूरी – मास्क है जरुरी’
Image

नवी दिल्ली, 5 ऑगस्‍ट 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येत ‘श्री राम जन्मभूमी मंदिरा’चे भूमीपूजन केले.

भारतासाठी एक गौरवशाली अध्याय

Image

याप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी या मंगलक्षणी देशातील नागरिकांचे आणि जगभरातील रामभक्तांचे अभिनंदन केले. आजच्या घटनेला ऐतिहासिक असे संबोधत ते म्हणाले, भारतासाठी आज एका गौरवशाली अध्यायाची सुरुवात होत आहे, देशभरातील लोकांनी ज्याची शतकानुशतके प्रतीक्षा केली होती, त्या क्षणासाठी लोक उत्साही आणि भावनिक झाले आहेत, काहीजणांना तर हा क्षण आपल्या कारकिर्दीत पाहता आला, यावर क्षणभर विश्वास बसत नसेल. त्यांनी अधोरेखीत केले की, राम जन्मभूमी पुन्हा तुटण्याच्या आणि पुन्हा उभारण्याच्या चक्रातून मुक्त झाली आहे आणि आता मंडपाच्या जागी रामललाचे भव्य मंदिर उभारले जाईल. 

Image

पंतप्रधान म्हणाले, 15 ऑगस्ट हा दिवस ज्याप्रमाणे स्वातंत्र्यलढ्यासाठी देशभरातील लोकांनी केलेल्या त्यागाचे प्रतिनिधीत्व आहे, त्याचप्रमाणे हा दिवस राम मंदिरासाठी पिढ्यानपिढ्यांच्या प्रचंड समर्पणाचे आणि अखंड संघर्षाचे प्रतीक आहे. राम मंदिराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी ज्यांनी संघर्ष केला त्या सर्वांचे पंतप्रधानांनी स्मरण केले आणि त्यांना अभिवादन केले.

श्रीराम – आपल्या संस्कृतीचा पाया

पंतप्रधान म्हणाले की, त्यांचे अस्तित्व नाकारण्याचे अनेक प्रयत्न केले जात असतानाही श्रीराम हे आपल्या संस्कृतीचा पाया आहेत. ते म्हणाले की, राममंदिर हे आपली संस्कृती, शाश्वत विश्वास, राष्ट्रीय भावना आणि सामुहिक इच्छाशक्तीचे आधुनिक प्रतीक आहे आणि आगामी पिढ्यांसाठी ते प्रेरणादायी ठरेल. मंदिर उभारणीच्या कामामुळे विविध क्षेत्रांत अनेक संधी निर्माण होतील आणि प्रदेशाची अर्थव्यवस्था बदलेल.

Image

पंतप्रधान म्हणाले, हा दिवस कोट्यवधी रामभक्तांच्या श्रद्धा आणि निग्रहाची साक्ष देतो. गेल्या वर्षी माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तेंव्हा एकमेकांच्या भावना समजून घेऊन देशातील नागरिकांनी निकालाला प्रतिसाद दिला त्या सन्मान आणि संयमाचे पंतप्रधानांनी कौतुक केले आणि आजही तोच सन्मान आणि संयम दिसून येत असल्याचे म्हटले. श्रीरामाचा विजय, श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलणे, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करणे, गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणे यासारख्या अनेक कार्यांमध्ये गरीब, मागासवर्गीय, दलित, आदिवासींसह सर्व स्तरातील लोकांनी कसा हातभार लावला याचे पंतप्रधानांनी स्मरण केले, त्याच पद्धतीने सामान्य नागरिकांच्या सहकार्याने आणि योगदानाने राममंदिराचे बांधकाम सुरू झाले आहे, असे ते म्हणाले.

श्रीराम यांच्या चारित्राचा आढावा घेताना पंतप्रधान म्हणाले की, त्यांनी नेहमी सत्याची बाजू घेतली, सामाजिक समरसता आपल्या राजवटीची कोनशिला म्हणून स्थापित केली. त्यांचे संपूर्ण प्रजेवर तितकेच प्रेम होते, पण गोरगरीब आणि गरजू लोकांप्रती त्यांची विशेष आस्था होती. जीवनाचा असा कोणताही पैलू नाही जिथे श्रीराम प्रेरणादायी ठरत नाहीत, त्यांचा प्रभाव देशाची संस्कृती, तत्वज्ञान, श्रद्धा आणि परंपरा या सर्व बाबींमध्ये दिसून येतो.

Image

श्री राम – विविधतेतील एकतेचा समान धागा

प्राचीन काळात वाल्मिकी रामायणातून, तर मध्ययुगीन काळात तुलसीदास, कबीर आणि गुरु नानक यांच्या माध्यमातून श्रीराम   मार्गदर्शनाचा    प्रमुख स्रोत ठरले  आहेत आणि अहिंसा व सत्याग्रहाचे उर्जा स्त्रोत म्हणून महात्मा गांधींच्या भजनांमध्ये देखील श्रीराम होते, असे पंतप्रधान म्हणाले. भगवान बुद्ध सुद्धा श्रीरामांशी संबंधित आहेत, आणि शतकानुशतके अयोध्या शहर हे जैन धर्माचे श्रद्धास्थान आहे, असे ते म्हणाले. विविध भाषांमध्ये लिहिलेल्या वेगवेगळ्या रामायणांविषयी बोलताना श्रीराम म्हणजे देशातील विविधतेतील एकतेचा समान धागा असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

श्रीराम अनेक देशांमध्ये पूजनीय आहेत असेही पंतप्रधानांनी  यावेळी नमूद केले. जास्तीत जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेले देश, इंडोनेशिया, कंबोडिया, लाओस, मलेशिया, थायलंड, श्रीलंका, नेपाळ, अशा देशांमध्येही रामायण लोकप्रिय असल्याचे पंतप्रधान म्हणाले. श्रीरामांचा संदर्भ इराण आणि चीनमध्येही आढळतो आणि राम कथा अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहेत, असेही त्यांनी नमूद केले. राममंदिराचे बांधकाम सुरू झाल्यामुळे आज या सर्व देशातील लोकांना नक्कीच आनंद झाला असेल असेही पंतप्रधान म्हणाले.

Image

संपूर्ण मानवतेसाठी प्रेरणा

येणाऱ्या काळासाठी हे मंदिर संपूर्ण मानवतेसाठी प्रेरणा ठरेल अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. श्री राम, राम मंदिर आणि आपल्या जुन्या परंपरेचा संदेश संपूर्ण जगापर्यंत पोहोचणे महत्वाचे आहे असेही पंतप्रधानांनी नमूद केले. हे लक्षात घेऊनच राम मंदिराची उभारणी करण्यात येत असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

राम राज्य

महात्मा गांधींजींचे स्वप्न असलेल्या रामराज्याची माहितीही पंतप्रधानांनी यावेळी दिली. श्री राम यांची शिकवण देशाला सतत मार्गदर्शन करत आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. कोणी गरीब किंवा दु: खी राहु नये; पुरुषांप्रमाणेच स्त्रिया देखील तितक्याच आनंदी असल्या पाहिजेत; शेतकरी आणि पशुपालक नेहमी आनंदी राहावे; वृद्ध, लहान मुले आणि डॉक्टर यांचे नेहमीच रक्षण केले पाहिजे; आश्रय शोधणाऱ्यांचे संरक्षण करणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे;  स्वर्गापेक्षा जन्मभूमी श्रेष्ठ आहे; एखाद्या राष्ट्रात जितकी जास्त शक्ती असते तितकीच शांतता प्रस्थापित करण्याची क्षमता अधिक, अशी श्री रामांची शिकवण आहे. श्रीरामांच्या या आदर्शांचे अनुसरण करून देश प्रगती करत आहे.

Image

परस्पर प्रेम आणि बंधुतेचा पाया

परस्पर प्रेम आणि बंधुता या आधारावर मंदिर बांधले जावे यावर पंतप्रधानांनी भर दिला. ‘सबका साथ’ आणि ‘सबका विश्वास’ च्या सहाय्याने आपल्याला ‘सबका विकास’ साध्य करून आत्मनिर्भर भारत बनविण्याची गरज आहे असेही पंतप्रधानांनी नमूद केले. कुठलाही विलंब न करता आपण पुढे मार्गक्रमण करत राहिले पाहिजे हा श्रीरामांचा संदेश अधोरेखित करत देशाने या संदेशाचे पालन करण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली.

कोविड काळात मर्यादा

कोविड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामांच्या ‘मर्यादा’ मार्गाचे महत्त्व पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केले. सद्यपरिस्थितीत सर्वांनी ‘दो गज की दूरी – मास्क है जरूरी’ या मर्यादांचे पालन करण्याची आवश्यकता असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

Mohanji_1  H x
30 वर्षांचा संघर्ष सार्थकी लागला-सरसंघचालक डॉ. भागवत यांचे प्रतिपादन

आजचा हा क्षण अतिशय आनंदाचा आहे. आम्ही सर्वांनीच एक संकल्प केला होता. मला आजही आठवते की, आमचे तेव्हाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरसजी यांनी, आम्हा सर्वांनाच हे पाऊल पुढे टाकण्यापूर्वी असे सांगितले होती की, अतिशय मेहनतीने 20 ते 30 वर्षेपर्यंत आपल्याला काम करावे लागेल, तेव्हाच त्याची पूर्तता होईल. आम्ही 20-30 वर्षे परिश्रम घेतले आणि तिसाव्या वर्षाच्या सुरुवातीला आम्हाला या संकल्पपूर्तीचा आनंद मिळाला. आज तीस वर्षांचा संघर्ष सार्थकी लागला, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज बुधवारी येथे केले. राममंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडल्यानंतर उपस्थितांना उद्‌बोधन करीत होते.

सर्वांनीच अथक परिश्रम घेतले, अनेकांनी प्राणाहुतीही दिली. ते सर्वच आज येथे सूक्ष्म रूपात उपस्थित आहेत. अनेक जण असेही आहेत, जे या सोहळ्यात प्रत्यक्षपणे उपस्थित राहू शकत नाहीत, परिस्थितीमुळे ते येऊ शकत नाहीत. रथयात्रेचे नेतृत्व करणारे अडवाणीजी आपल्या निवासस्थानी हा ऐतिहासिक सोहळा पाहात आहेत. किती तरी लोक असे आहेत, जे येथे येऊ शकले असते, पण परिस्थितीच अशी आहे की, त्यांना इच्छा असूनही बोलावता आले नाही. तेदेखील आपापल्या घरी राहून हा सोहळा पाहात आहेत. देशभरात सर्वत्र आनंदाची लाट असल्याचे मी पाहात आहे. अनेक दशकांची अपेक्षा पूर्ण झाल्याचा हा आनंद आहे, असे मोहनजी म्हणाले.
 
 
आज सर्वांत मोठा आनंद हा आहे की, भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी ज्या आत्मविश्वासाची आणि आत्मभानाची गरज होती, त्याचा सगुण-साकार अधिष्ठान होण्याचा शुभारंभ आज झाला आहे. हे अधिष्ठान आहे त्या आध्यात्मिक दृष्टीचे! ‘सिया राममय सब जग जानहि ।’ अर्थात्‌, संपूर्ण विश्वाला आपल्यात पाहणे आणि स्वत:ला विश्वात पाहण्याची भारताची दृष्टी आहे. याच कारणामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाचा व्यवहार आजही जगात सर्वाधिक सज्जनतेचा असतो आणि या देशाचा संपूर्ण जगासोबत एकसारखाच व्यवहार असतो. ‘वसुधैव कुटुम्बकम्‌’ हाच भारताचा सिद्धांत आहे. असा स्वभाव आणि त्याला अनुसरून आपल्या कर्तव्यांचे पालन करून, व्यावहारिक जगातील सर्व समस्यांमधून मार्ग काढत, जितके शक्य आहे, त्या प्रमाणात सर्वांना सोबत घेऊन चालण्याची जी संहिता तयार होत असते, त्याचे अधिष्ठान आज येथे पार पडत आहे. सर्व वैभवांनी संपन्न आणि सर्व जगाचे कल्याण करणार्‍या भारताच्या निर्मितीचा शुभारंभ आज त्या हातांनी होत आहे, ज्यांच्याजवळ या निर्मितीच्या व्यवस्थेचे नेतृत्व आहे आणि ही बाब आणखीच आनंदाची आहे, असे सरसंघचालक म्हणाले.
 
 
अशोक िंसघल यांचे स्मरण 
आज सर्वांनाच स्मरण होत असेल आणि स्वाभाविक विचारही मनात येत असेल की, अशोकजी िंसघल आज येथे असते, तर किती चांगले झाले असते. पू. महंत रामचंद्रदास परमहंसजी आज असते, तर किती चांगले असते. मात्र, त्या परमेश्वराची जी इच्छा असते, तेच घडत असते. माझा असा विश्वास आहे की, जे येथे आहेत, ते आपल्या मनातून आणि जे नाहीत, ते सूक्ष्म रूपात येथे त्या आनंदाचा केवळ अनुभवच घेत नसतील, तर हा आनंद शेकडो पटीने वाढवतही आहेत. या आनंदात एक प्रेरणा आहे, उत्साह आहे.
 
 एतद्देशप्रसूतस्य सकाशादग्रजन्मनः ।
स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन्पृथिव्यां सर्वमानवाः।
 
आपल्याला सर्वांना जीवन जगण्याचे शिक्षण द्यायचे आहे. आता कोरोना संकटाचा काळ आहे. संपूर्ण जग एकच विचार करीत आहे की, नेमके काय चुकले आणि यातून पुढचा मार्ग कसा निघेल. जगाने दोन मार्ग बघितले, आता आणखी तिसरा मार्ग आहे का, यावर विचार केला जात आहे. याचे उत्तर ‘होय’ असे आहे. हा मार्ग आमच्याकडे आहे. तो आम्ही जगाला देऊ शकतो आणि तो दाखविण्याचे कामही आपल्यालाच करावे लागणार आहे. याची तयारी करण्याचा संकल्प करण्याचाही आजचाच दिवस आहे आणि यासाठी आवश्यक असतो पुरुषार्थ! हे एक व्रत आहे व ते आपण केले आहे. प्रभू श्रीरामांच्या जीवनापासून आतापर्यंत जर आपण पाहिले, तर असे दिसेल की, तो पुरुषार्थ, पराक्रम, वीरवृत्ती आपल्या शरीरात ठासून भरली आहे. आपण ते गमावले नाही, आपल्याजवळच आहे. आपण पुढाकार घेतला, तर नक्कीच यश मिळेल. हा विश्वास आणि प्रेरणा आपल्याला आजच्या याच दिवसापासून मिळते, याला कुणीच अपवाद असू शकत नाही, कारण आपल्या सर्वांमध्येच राम आहे, असे ते म्हणाले.
 
 
अयोध्येला मनात सजवायचे आहे
आता अयोध्येतील या जन्मभूमीत भगवान रामाचे भव्य मंदिर उभे राहणार आहे. प्रक्रिया सुरू झाली आणि जबाबदार्‍याही सोपविण्यात आल्या आहेत. प्रत्येकच जण आपले कर्तव्य पार पाडणार आहे. आता आपल्या सर्वांनाच अयोध्येला मनात बसवायचे आहे, सजवायचे आहे. या महान कार्यासाठी भगवान राम ज्या धर्माचे प्रतीक मानले जातात, तो सर्वांना जोडणारा, विकास करणारा आणि सर्वांना आपला समजणारा धर्म आहे, त्या धर्माची पताका आपल्या खांद्यावर घेऊन संपूर्ण जगाला सुख आणि शांतता प्रदान करणारा भारत आपल्याला घडवायचा आहे. यासाठी आपल्याला मनात अयोध्या बसवायची आहे. येथे जसजसे मंदिर बनेल, तसतशी आपल्या मनातही अयोध्या फुलायला हवी. रामाचे मंदिर पूर्ण होण्यापूर्वी आपले मनमंदिर पूर्ण व्हायला हवे, असे त्यांनी स्पष्ट केले. हे मनमंदिर कसे असावे, याविषयी तुलसीदाज यांनी रामचरितमानसमध्ये सांगितले आहे.
 
 
काम कोह मद मान न मोहा। लोभ न छोभ न राग न द्रोहा।
जिन्ह कें कपट दंभ निंह माया। तिन्ह कें हृदय बसहु रघुराया
जाति पॉंति धनु धरमु बड़ाई। प्रिय परिवार सदन सुखदाई।
सब तजि तुम्हहि रहइ उर लाई। तेहि के हृदयँ रहहु रघुराई।
आपले हृदय रामाचे घरच असायला हवे. सर्व दोष, विकार, द्वेष आणि शत्रुत्वापासून मुक्त होऊन, जगाचा मायाजाळ कसाही असो, त्यात सर्व प्रकारचे व्यवहार करण्यासाठी ते समर्थ असावे. हृदयातील सर्व प्रकारच्या पक्षपाताला दूर करून, केवळ आपल्या देशासाठीच नाही, तर संपूर्ण जगाला स्वीकारण्याची क्षमता ठेवणारा या देशातील व्यक्ती व समाज निर्माण करण्याचे हे कार्य आहे. या समाजाची निर्मिती करणारा एक सगुण साकार प्रतीक येथे उभारले जाणार आहे. हे प्रतीक आपल्या सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहणार आहे. राममंदिर बांधण्याचे कार्य भारतवर्षातील लाखो अन्य मंदिरांप्रमाणे फक्त आणखी एक मंदिर बनविण्यासारखे नाही, तर देशातील सर्व मंदिरांमध्ये स्थापित मूर्तींचा जो आशय आहे, त्याचे पुनर्प्रकटीकरण आणि पुनर्स्थापनेचा शुभारंभ आज येथे अतिशय सशक्त हातांनी झाला आहे. या मंगलमय पर्वावर, या आनंदाच्या प्रसंगी मी आपल्या सर्वांचेच अभिनंदन करतो, असेही डॉ. मोहनजी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *