शेतकऱ्यांना तातडीने मदत न मिळाल्यास आंदोलन-वैजापूर भाजपने दिला इशारा

वैजापूर ,६ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-अतिवृष्टी व पुरामुळे वैजापूर तालुक्यात शेती पिकांचे व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून,पिकांच्या नुकसानीस हेक्टरी पन्नास हजार रुपये व जंगम मालमत्तेच्या मूल्यांकनानुसार शंभर टक्के नुकसान भरपाई त्वरित द्यावी.अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.असा इशारा वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्यावतीने वैजापूर भाजपने एका निवेदनाद्वारे दिला आहे.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी दोन दिवसांपूर्वी वैजापूर तालुक्याचा दौरा करून शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली होती.या अनुषंगाने कराड यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली.अतिपावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत कशी करता येईल याबाबत बैठकीत चर्चा झाली.आपद्ग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांना तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्यासंदर्भात डॉ.कराड यांनी अधिकाऱ्यांना यावेळी निर्देश दिले.या बैठकीस विधानपरिषदेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्यावतीने भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी, तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे,ज्ञानेश्वर पाटील जगताप, कैलास पवार आदींनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना यावेळी मागण्यांचे निवेदन दिले.वैजापूर तालुक्यात अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे शेतीपिकांचे व मालमत्तेचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. शेतजमिनीही वाहून गेल्या असून,ग्रामीण भागातील रस्ते वाहून गेले आहेत.रस्तेच वाहून गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पिकांच्या नुकसानीस हेक्टरी पन्नास हजार रुपये व जंगम मालमत्तेच्या मूल्यांकनानुसार शंभर टक्के नुकसान भरपाई त्वरित द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.