कोविड -19: सलग आठवडाभर 50,000 पेक्षा कमी दैनंदिन नवीन रुग्णसंख्येची नोंद

नवी दिल्ली,४ जुलै /प्रतिनिधी:-भारताच्या एकूण लसीकरणाने काल 35 कोटींचा महत्वपूर्ण टप्पा गाठला. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, एकूण 46,04,925 सत्रांद्वारे 35,12,21,306 लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत लसींच्या 63,87,849 मात्रा देण्यात आल्या.

कोविड 19 लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाचा नवीन टप्पा 21 जून 2021 पासून सुरू झाला. केंद्र सरकार देशभरात कोविड-19 लसीकरणाची गती आणि व्याप्ती वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे.

गेल्या 24 तासांत भारतात 43,071 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

सलग  आठवडाभर 50,000 पेक्षा कमी दैनंदिन रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या निरंतर आणि एकत्रित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

देशात उपचाराधीन रुग्णसंख्येतही सतत घसरण होत आहे. देशातील एकूण उपचाराधीन रुग्णसंख्या आज 4,85,350  इतकी आहे.

गेल्या 24 तासांत एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येत 10,183 ची घट नोंदली गेली आणि देशातील एकूण बाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्ण केवळ 1.59% आहेत.

कोविड -19 संसर्गातून मोठ्या संख्येने लोक बरे होत आहेत. भारतातील बरे झालेल्यांची दैनंदिन संख्या सलग 52 दिवस नवीन रुग्णसंख्येपेक्षा अधिक आहे. गेल्या 24 तासांत 52,299 रुग्ण बरे झाले आहेत.

दैनंदिन नवीन रुग्णांच्या तुलनेत गेल्या 24 तासांत 9,000 (9,228) पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले.

महामारीच्या सुरुवातीपासून संसर्ग झालेल्या लोकांपैकी 2,96,58,078 रुग्ण कोविड -19 संसर्गातून बरे झाले आहेत. आणि गेल्या 24 तासांत, 52,299 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 97.09% आहे, जो सतत वाढता कल दर्शवत आहे.

संपूर्ण देशभरात चाचणी क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, गेल्या 24 तासांत देशातील एकूण 18,38,490 चाचण्या घेण्यात आल्या. एकत्रितरित्या, भारताने आतापर्यंत 41.82 कोटी (41,82,54,953) पेक्षा जास्त चाचण्या केल्या आहेत.

देशभरात एकीकडे चाचणी क्षमता वाढवण्यात आली आहे, तर साप्ताहिक सकारात्मकतेत निरंतर घट दिसून येत आहे. साप्ताहिक सकारात्मकता दर सध्या 2.44% वर आहे तर दैनंदिन सकारात्मकता दर आज 2.34% आहे. सलग 27व्या  दिवशी दैनंदिन सकारात्मकतेचा दर 5% पेक्षा कमी राहिला आहे.