शिवछत्रपतींचा वसा पुढे नेण्यासाठी वचनबद्ध होऊ या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा

मुंबई, दि. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी कारभाराचा जगापुढे आदर्श आहे. त्याअर्थाने शिवराज्याभिषेक दिन हा संकल्प दिन मानून शिवछत्रपतींनी दिलेला वसा पुढे नेण्यासाठी वचनबद्ध होऊ या, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन म्हणजे महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला एक अपूर्व मंगल क्षण. क्षणोक्षणी केवळ रयतेच्या सुखाचा विचार करणाऱ्या शिवछत्रपतींवर अढळ श्रद्धा ठेवून वाटचाल करण्याचा हा संकल्प दिन. त्यांचा लोककल्याणकारी राज्य कारभार जगात आदर्श मानला जातो. आव्हानांवर मात करताना धीरोदात्तपणे पुढे जाण्याचा त्यांचा बाणा आज मार्गदर्शक ठरतो आहे. त्यांनी दाखविलेल्या वाटेवरून पुढे जाण्यासाठी,  दिलेला हा वसा आणि वारसा पुढे नेण्यासाठी आपण वचनबद्ध होऊ या. हे वचन त्यांच्या चरणी अर्पण करू या. यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शिवछत्रपतींना त्रिवार मुजरा!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन

मुंबई. दि. ६ :- छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात रयतेचे राज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन केले, ‘प्रजा सुखी तरच राजा सुखी’ या न्यायाने राज्यकारभार केला. महान योद्धा, कुशल प्रशासक, लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष राजा ही ओळख निर्माण केली. राजनीती, युद्धनीती, अर्थकारण, मानवतावाद, पर्यावरणसंवर्धन, कुशलतेसह भविष्याचा वेध घेण्याचे द्रष्टेपण असलेले ते राजे होते. त्यांनी गाजवलेलं शौर्य, केलेला पराक्रम, घालून दिलेला राज्यकारभाराचा आदर्श महाराष्ट्राला सदैव मार्गदर्शन व प्रेरणा देत राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना त्रिवार वंदन केले आहे. महाराष्ट्रातील जनतेला शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन

‘शिवराज्याभिषेक दिना’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन

पुणे, दि. 6 : ‘शिवराज्याभिषेक दिना’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथील विधानभवनातील (कौन्सिल हॉल) छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या प्रतिमेला पुष्‍पहार घालून वंदन केले. यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार डॉ.अमोल कोल्‍हे, विभागीय आयुक्‍त डॉ.दीपक म्‍हैसेकर, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, आमदार अतुल बेनके, आमदार सुनील टिंगरे, उपायुक्‍त संजयसिंह चव्‍हाण आदींसह इतर लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. उपमुख्‍यमंत्री श्री पवार यांनी उपस्थितांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *