शासनाने दिलेल्या मुदतीच्या आत शेतकऱ्यांची संपूर्ण मका खरेदी करण्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश

नाशिक : शासनाने मका खरेदीसाठी ३० जून पर्यंत मुदत दिली आहे. मात्र मका खरेदी प्रक्रिया संथगतीने होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त होत असून शासनाने दिलेल्या मुदतीच्या आत सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण मका खरेदी करा, असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथे सुरु असलेल्या मका खरेदी केंद्राबाबत संबधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी मका खरेदी प्रक्रिया संथगतीने होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मका खरेदीसाठी जास्तीचे वजन काटे यासह आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर श्री.भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील मका खरेदी बाबत आढावा घेऊन मका खरेदी प्रक्रिया जलदपणे करून जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याचा मका शिल्लक राहता कामा नये, असे आदेश दिले. त्याचबरोबर बारदानाअभावी मका खरेदीस अडचणी येत असल्याने व्यवस्थापकीय संचालक पणन विभाग यांचेशी बैठकीतून संपर्क साधून त्यांनी जिल्ह्यातील सर्व मका खरेदी केंद्रावर बारदान उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना मंत्री श्री.भुजबळ यांनी दिल्या आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवसात मका खरेदी प्रक्रिया अधिक जलद गतीने होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *