महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डीजीपी : पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती

मुंबई,४ जानेवारी / प्रतिनिधी :-आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या ‘पोलीस महासंचालक’पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंचालक होण्याचा बहुमान मिळाला आहे. शुक्ला या 1988 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी यांच्यावर आरोप करण्यात आले होते. तसेच, त्यांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाते. गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या महासंचालक पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरु होती.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवारी(29 डिसेंबर)बैठक घेतली होती. यात महासंचालक पदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी पाठवली होती. यात रश्मी शुक्ला यांचे नाव सर्वात वरती होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना यावर अंतिम निर्णय घ्यायचा होता. अखेर आज शुक्ला यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. रश्मी शुक्ला यांना सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. मात्र, राज्यसरकार त्यांना मुदतवाढ देऊ शकते.

फोन टॅपिंक प्रकरणी चर्चेत

राज्यात झालेल्या फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांचे नाव चर्चेत आले होते. महाविकास आघाडीचे सरकार असताना, फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरु झाली होती. यात शुक्ला यांच्यावर आरोप करण्यात आले होते. याप्रकरणी त्यांची चौकशी देखील करण्यात आली होती. त्या राज्याच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना त्यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीती महत्वाच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता.