देव जरी खाली आला तरी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण घेण्यापासून रोखू शकत नाही: मनोज जरांगे-पाटील

मनोज जरांगें यांची आज बीड जिल्ह्यात सभा; पुढील आंदोलनाची घोषणा होणार

परभणी ,२२ डिसेंबर /प्रतिनिधी :-एकजूट फुटू देऊ नका, इथं ना तुमचा फायदा, ना माझा फायदा. घराघरातल्या मराठ्यांच्या लेकरांचा हा फायदा आहे. तुमची लेकरे मोठी होणार, न्याय तुमच्या लेकरांना मिळणार, मागं हटू नका. शांततेत आंदोलन करा. मराठ्यांनो ताकदीनं एकत्र या, असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला केले आहे. जरांगे यांनी दिलेल्या अल्टिमेटमनुसार मराठा आरक्षण जाहीर करण्यासाठी सरकारकडे दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या दोन दिवसांत निर्णय घ्या, असा इशारा जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

समाजाला आवाहन करताना ते म्हणाले, नेत्याला जातीपेक्षा मोठं मानू नका, जात संकटात सापडली, पोरंही संकटात सापडली आहेत. भानावर या. आपल्या लेकरांपेक्षा मोठं आपल्यासाठी कुणीही नाही. मी तुमच्यासाठी जीव पणाला लावलाय. मला तुमच्या साथीची गरज आहे. मला तुमचं पाठबळ हवं आहे. तुमच्या आशिर्वादाची गरज आहे. तुम्ही माझ्या खांद्याला खांदा लावून लढायला हवं. सरकारनं मला शत्रू मानायला सुरुवात केली आहे. मी गरीब मराठ्यांच्या वेदना मांडल्या. काय चूक केली, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

सरकारला आधी ३ महिने वेळ दिला, तेव्हा समिती गठीत झाली तरीही काही झाले नाही. त्यानंतर सरकारचे शिष्टमंडळ आले, त्यांनी ३० दिवसांचा वेळ मागितला, मी ४० दिवसांचा दिला. पुन्हा आले, पुन्हा बोलले, मागणी प्रमाणे आरक्षण हवं तर आधार लागलो. पुन्हा समिती नेमली, समितीला नोंदी सापडल्या. आता तुम्हाला कायदा पारित करायला अडचण काय, असा सवालही त्यांनी राज्य सरकारला केला.

मराठ्यांना आरक्षण घेण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. देव जरी खाली आला तरी, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण घेण्यापासून रोखू शकत नाही. मराठ्यांनी सावध राहण्याची गरज आहे. सरकारने एकाला अटक केली की सर्वांनी तुरुंगात जायचं. सरकारने गांभीर्यानं घेतलं नाही तर सरकारला जड जाईल,असा इशारा देखील जरांगे यांनी दिला आहे.

शनिवारी  बीड शहरात मनोज जरांगे यांची सभा होत आहे. या सभेतून मनोज जरांगे २४ डिसेंबर नंतरच्या आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहे. त्यामुळे या सभेला राज्यभरातील मराठा आंदोलक आणि मराठा बांधव उपस्थित राहणार आहे. या सभेसाठी तब्बल पाच लाख लोकांची गर्दी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.दहा वाजता बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू झालेली रॅली ही अण्णाभाऊ साठे चौक आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर सभास्थळी पोहचेल. दरम्यान, अडीच ते तीन किलोमीटरची ही रॅली साडेतीन ते चार तासानंतर अंदाजे दोन वाजता सभास्थळी पोहचेल.