छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा लंडनमध्ये उभारणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

लंडन : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा लंडनच्या भूमीत उभारण्यासाठी आपण व्यक्तिशः आणि महाराष्ट्र सरकार  पूर्ण सहकार्य करेल, असे प्रतिपादन राज्याचे वने,  सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट संग्रहालयाशी यशस्वी करार केल्यानंतर मंत्री श्री. मुनगंटीवार यांचा  लंडनच्या स्थानिक मराठी बांधवांनी सत्कार केला. या सोहळ्यात ते बोलत होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की,  मला जेव्हा सूचना केली की, लंडन येथे  छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सुंदर पुतळा  उभा करावा, तेव्हा मला आनंद झाला; मी लगेच संमती दिली. यासाठी महाराष्ट्र सरकार पूर्ण शक्तीने तुमच्या पाठिशी उभे राहील. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जगात सर्वत्र पोहचविण्याचा संकल्प शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त महाराष्ट्र शासनाने केला आहॆ. यासाठी सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.

सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षी काम करण्याची संधी मिळाली. राज्यात ठिकठिकाणी जाणता राजा महानाट्याचे प्रयोग, असे विविध उपक्रम राबविण्याची संधी मिळाली, असे ते म्हणाले.

दरम्यान, सामंजस्य करार झाल्यानंतर अतिशय देखणा सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला; स्फूर्ती गीत, पोवाडा, पारंपरिक नृत्य, छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रसंग अशा विविध छटांचा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.