भारत ही संशोधनासाठी एक आदर्श चाचणी प्रयोगशाळा -पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली,​१९ ऑगस्ट / प्रतिनिधी:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेंगळुरू येथे झालेल्या G-20 डिजिटल अर्थव्यवस्था मंत्र्यांच्या बैठकीला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी बंगळुरू शहरात मान्यवरांचे स्वागत केले आणि सांगितले की विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योजकता आणि डिजिटल अर्थव्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी यापेक्षा चांगली जागा असू शकत नाही.

गेल्या 9 वर्षात भारतात झालेल्या अभूतपूर्व डिजिटल परिवर्तनाचे श्रेय पंतप्रधानांनी 2015 मध्ये डिजिटल इंडिया उपक्रमाच्या शुभारंभाला दिले. त्यांनी अधोरेखित केले की भारताचे डिजिटल परिवर्तन नाविन्यपूर्णतेवरील अढळ विश्वास आणि जलद अंमलबजावणीची बांधिलकी आणि समावेशाच्या भावनेने प्रेरित आहे जे कोणालाही मागे सोडत नाही.

देशातील अतुल्य विविधतेचा उल्लेख करत पंतप्रधानांनी भारतामध्ये डझनभर भाषा आणि शेकडो बोली आहेत यावर भर दिला. ते पुढे म्हणाले की जगभरातील प्रत्येक धर्म आणि असंख्य सांस्कृतिक प्रथा भारतात आहेत. “प्राचीन परंपरांपासून ते अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत, भारतामध्ये प्रत्येकासाठी काहीतरी आहे” असे पंतप्रधानांनी सांगितले. अशा विविधतेमुळे भारत ही संशोधनासाठी एक आदर्श चाचणी प्रयोगशाळा आहे, असे ते म्हणाले. भारतात यशस्वी होणारे संशोधन जगात कुठेही सहज वापरता येऊ शकते असे त्यांनी अधोरेखित केले. भारत आपले अनुभव जगासोबत सामायिक करण्यास तयार असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आणि कोविड महामारीच्या काळात जागतिक कल्याणासाठी कोविन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याचे उदाहरण दिले. भारताने इंडिया स्टॅक हे ऑनलाइन ग्लोबल डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर रिपॉझिटरी तयार केले आहे जेणेकरून कोणीही विशेषतः ग्लोबल साउथमधील देश मागे राहणार नाहीत.

कार्यगट G20 वर्च्युअल ग्लोबल डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर रिपॉझिटरी तयार करत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी तयार केला जात असलेला सामायिक आराखडा सर्वांसाठी पारदर्शक, जबाबदार आणि निष्पक्ष डिजिटल परिसंस्था तयार करण्यात मदत करेल असे अधोरेखित केले. डिजिटल कौशल्याची तुलना सुलभ करण्यासाठी एक मार्गदर्शक आराखडा विकसित करण्याचे तसेच डिजिटल कौशल्याबाबत व्हर्च्युअल उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याच्या प्रयत्नांचेही त्यांनी स्वागत केले. भविष्याच्या दृष्टीने सज्ज मनुष्यबळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे प्रयत्न महत्त्वाचे आहेत असे ते म्हणाले. डिजिटल अर्थव्यवस्थेचा जागतिक स्तरावर प्रसार होत असताना सुरक्षा संबंधी धोके आणि आव्हानांना सामोरे जावे लागेल हे लक्षात घेऊन सुरक्षित, विश्वासार्ह आणि लवचिक डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी G20 उच्च-स्तरीय तत्त्वांवर सर्वसहमती निर्माण करणे महत्त्वाचे आहे याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

“तंत्रज्ञानाने आपल्याला परस्परांशी जोडले आहे. सर्वांसाठी समावेशक आणि शाश्वत विकासाचे वचन कायम राखले आहे” असे सांगत पंतप्रधानांनी जी 20 राष्ट्रांना सर्वसमावेशक, समृद्ध आणि सुरक्षित जागतिक डिजिटल भविष्याचा पाया रचण्याची वैशिष्ट्यपूर्ण संधी आहे यावर भर दिला. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून आर्थिक समावेशकता आणि उत्पादकता यांना गती देता येऊ शकते, असे त्यांनी नमूद केले. शेतकरी आणि लहान व्यवसायांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापर करण्याला प्रोत्साहन देणे, जागतिक डिजिटल आरोग्य परिसंस्था उभारण्यासाठी तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सुरक्षित आणि जबाबदार वापरासाठी एक आराखडा विकसित करण्याची सूचना त्यांनी केली. मानवतेला भेडसावणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तंत्रज्ञान-आधारित उपायांची संपूर्ण परिसंस्था उभारली जाऊ शकते. “यासाठी आपल्याकडून – दृढ विश्वास (Conviction), वचनबद्धता (Commitment), समन्वय (Coordination) आणि सहकार्य (Collaboration) हे केवळ चार सी आवश्यक आहेत” यावर मोदी यांनी भर दिला. कार्यगट आपल्याला त्या दिशेने पुढे नेईल, असा विश्वास पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप करताना व्यक्त केला.

भाषांमधील अडथळे दूर करण्यासाठी AI आधारित ‘भाषिणी’ टूल

 भारत (India) हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे अनेकविध भाषा बोलणारे लोक एकत्र राहतात. मराठी, हिंदी, पंजाबी, नेपाळी, तेलगू, बंगाली यासारख्या अनेक भाषा बोलल्या जातात. मात्र, प्रत्येकालाच प्रत्येक भाषा येते असं नाही. अशावेळी भाषांमध्ये अडथळे येऊ नयेत, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एआय (AI) आधारित ‘भाषिणी’ (Bhashini) प्लॅटफॉर्मची घोषणा केली आहे. शनिवारी जी २० (G20) डिजिटल इकोनॉमी मंत्र्याच्या बैठकीला संबोधित करताना ही घोषणा त्यांनी केली आहे.

भाषिणी हे AI वर आधारित भारताने विकसित केलेले अनुवाद करणारे प्लॅटफॉर्म आहे. डिजिटल इंडियाच्या (Digital India) दृष्टीने ही एक यशस्वी वाटचाल आहे. सध्या जगभरामध्ये AI चा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यास सुरुवात झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. पुढे ते म्हणाले, विविधतेने नटलेल्या भारत देशात अनेक जाती धर्मांचे लोक खूप आनंदात एकोप्याने राहतात. तसेच येथे अनेक भाषा बोलल्या जातात. AI वर आधारित भाषिणी टूल हे भाषांमधील अडथळा दूर करण्याचे काम करणार आहे. भाषिणीचे मुख्य उद्दिष्ट हे विविध भारतीय भाषांमधील अडथळे दूर करण्याचे आहे.