ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन

मुंबई,९ ऑगस्ट /प्रतिनिधी :-ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे वयाच्या ७०व्या वर्षी मुंबईतील बीकेसी येथील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये निधन झाले.

काही दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नव्हती. अशात आज (९ ऑगस्ट) सकाळी मुंबईकडे जात असताना गाडीत त्यांना उलट्या झाल्या आणि हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

प्रा. नरके यांचा महाराष्ट्रातील समाजिक चळवळींशी निकटचा संबंध होता. फुले, शाहु, आंबेडकर यांच्या विचारसरणीतील अग्रक्रमाचे विचारवंत म्हणून त्यांना ओळखले जात होते. ओबीसींच्या प्रश्नांवर त्यांचा गाढा अभ्यास होता. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले. मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वातील समता परिषदेचे ते उपाध्यक्ष देखील होते. या परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ओबीसींच्या प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना अनेकदा धारेवर धरले होते.

हरी नरके यांचा शैक्षणिक क्षेत्राशी अत्यंत निकटचा संबंध राहिला. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे अध्यासन प्राध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. सोबतच पुण्यातील आंतरराष्ट्रीय किर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवरही त्यांनी महत्वपूर्ण कार्य केलं. संस्कृत, कन्नड, तेलुगू प्रमाणेच मराठी भाषाही एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून नरके यांनी योगदान दिले आहे.

हरी नरके यांच्या निधनाने समाज एका पुरोगामी चळवळीला मुकला आहे. फुले व आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरिखित करणे आणि शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घडून आणण्यामध्ये हरी नरके यांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र शासनाने समग्र महात्मा फुले हा एक हजार पानाचा ग्रंथ अद्ययावत करून प्रकाशित केला, त्याचे संपादक हरी नरके होते. डॉ आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचे राज्य शासनाने २६ खंड प्रकाशित केले, त्यातील सहा खंडांचे संपादन हरी नरके यांनी केले होते.

ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते. तसेच भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष देखील होते. प्रा. हरी नरके यांची दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत. महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन आणि महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा या दोन पुस्तकांचा समावेश आहे.

प्रा. हरी नरके यांच्या निधनाने पुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड विचारवंत गमावला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

“महाराष्ट्रातील पुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड असा विचारवंत आपण गमावला आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

“महाराष्ट्राच्या विचार – व्यासपीठावर आपल्या अभ्यासपूर्ण आणि परखड विचारांनी प्रा. हरी नरके यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. फुले – शाहू – आंबेडकर यांचा विचार महाराष्ट्रासह सर्वदूर पोहोचावा यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा जीवनपरिचय आणि त्यांच्या विषयीचे संशोधनात्मक लेखन यांचा त्यांचा व्यासंग होता. यातून त्यांनी उत्कृष्ट अशा ग्रंथसंपदेची निर्मिती केली. वक्तृत्वाची आगळी शैली आणि अभ्यासपूर्ण मांडणी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांनी समता परिषदेच्या माध्यमातून रचनात्मक काम केले. त्यांच्या निधनामुळे पुरोगामी चळवळ आणि राज्यातील अभ्यास – संशोधनात्मक लेखन प्रवाहाची हानी झाली आहे,” असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

“ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महाराष्ट्राने महात्मा फुले यांच्या साहित्याचा आणि विचारांचा अभ्यासक गमावला आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस अपल्या संदेशात म्हणतात, “प्रा. हरी नरके यांनी आपल्या लेखनातून आणि व्याख्यानातून नेहमी महात्मा फुले यांचे विचार मांडले. त्यांच्या निधनाने नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !”

ओबीसी, परिवर्तनवादी चळवळीतील बुद्धिवादी व्यक्तिमत्व हरपले – उपमुख्यमंत्री अजित पवार

“ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा असलेला, ओबीसी हक्कांसाठीच्या चळवळीत आघाडीवर राहून लढणारा कृतिशील कार्यकर्ता आपण गमावला आहे. ते सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक, परखड भाष्यकार होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या साहित्याचे अभ्यासक, संशोधक, व्याख्याते ही त्यांची ओळख होती. तत्कालिन पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले होते. प्रा. हरी नरके यांनी अनेक शासकीय समित्यांवर तज्ज्ञ सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांच्या निधनानं दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांची बाजू हिरिरीने मांडणारे, ओबीसी चळवळीला वाहून घेतलेले बुद्धिवादी व्यक्तिमत्व हरपले आहे. त्यांचे निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, परिवर्तनवादी चळवळीची हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यानी प्रा. हरी नरके यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी घेतले प्रा. हरी नरके यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

पुणे : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी वैकुंठ स्मशानभूमी येथे ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक प्रा.हरी नरके यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून श्रद्धांजली वाहिली. यावेळी आमदार कपिल पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार उल्हास पवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

श्री. भुजबळ म्हणाले, हरी नरके हे समाजासाठी वैचारिक आधारस्तंभ होते. त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कर्तृत्व, इतिहास अतिशय बारकाईने अभ्यास करुन समाजासमोर आणले.

सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेले नायगाव येथे त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीनुसार तत्कालिन दिसणाऱ्या घराची राज्य शासनाने बांधणी केली आहे. त्यांनी लिहिलेल्या विविध ग्रंथाचे आज हिंदी, इंग्रजी भाषेत अनुवाद झाले आहेत. देश विदेशात त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण त्यांनी भाषणे केली. त्यांच्या निधनाने महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात श्री. भुजबळ यांनी श्रद्धांजली वाहिली.

यावेळी श्री.भुजबळ यांनी नरके कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी पत्नी संगिता नरके, कन्या कु.प्रमिती नरके, भाऊ सर्वश्री लक्ष्मण नरके, ईश्वर नरके, दत्तात्रय नरके, सुदाम नरके आणि पुतणे विष्णू नरके व अनिल नरके उपस्थित होते.