राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सीड पार्क उभारण्याची तयारी – कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई,२८ जुलै /प्रतिनिधी :-राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सीड पार्क उभारण्यासाठी कृषी विभागाची तयारी असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या वेळी दिली.

राज्यातील बियाणे उद्योग तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये स्थलांतरित होत असल्याबाबतचा  प्रश्न सदस्य सचिन अहीर यांनी  उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना कृषी मंत्री श्री.मुंडे बोलत होते.

कृषीमंत्री श्री. मुंडे म्हणाले की, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून  सीड पार्क उभारण्यासाठी  कृषी  विभागाची   तयारी आहे.  याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. राज्यात सन २०१९ मध्ये ६५४ बियाणे कंपन्या कार्यरत होत्या. सन २०२१ आपले सरकार पोर्टल व महापरवाना प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. तसेच सध्या १५८० कापूस व इतर बियाणे कंपन्या कार्यरत आहेत. तसेच बोगस बि-बियाणे यासंदर्भात विभागाने वेळोवेळी  कारवाई केलेली आहे तसेच आपण लवकरच बोगस बी बियाणे यासंदर्भात आलेल्या तक्रारीसाठी  शेतक-यांच्या हिताचा कायदा पावसाळी अधिवेशनात येणार आहे. ‘महाबीज’चे बळकटीकरण  करणार असल्याचेही  कृषी मंत्री  श्री. मुंडे  यांनी  सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत  विरोधी  पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला.