दरोडा टाकणा-यांनी चोरीची भाषा करणे योग्य नाही– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : “दरोडा टाकणा-यांनी चोरीची भाषा करणे योग्य नाही. मुंबई महापालिकेच्या कारभाराबाबत कॅगने ताशेरे ओढले. आता एसआयटीची स्थापना झाल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळेच मुंबईत मोर्चा काढून जनतेची दिशाभूल करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्याविरोधात ठाकरे गटाने १ जुलै रोजी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गेली १५-२० वर्षे मुंबई महापालिकेवर दरोडा टाकला. मुंबई महापालिकेचे हजारो कोटी कुठे गेले, याचा हिशेब आता कॅग विचारणार आहे. एसआयटीची स्थापना झाल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. दूध का दूध पानी का पानी होईल. उलटा चोर कोतवाल को दांटे असा प्रकार आहे. कॅगच्या ताशेऱ्यांवर एसआयटी लावली आहे, ती निष्पक्षपणे काम करेल, मुंबईकरांचा पैसा मुंबईकरांच्याच तिजोरीत राहायला हवा. तो कोणालाही वळवता येणार नाही. एसआयटीच्या कारवाईत उघडे पडू नये म्हणून स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी ही धडपड सुरू आहे.”