महाजनकोने काढलेल्या फ्लू गॅस डिसल्फ्युरायझेशन संच स्थापित करण्यासाठी काढलेल्या निविदांचा फेरविचार करावा-विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली मागणी

मुंबई, १२ जून / प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित (महाजनको) कंपनीने फ्लू गॅस डिसल्फ्युरायझेशन संच (FGD) स्थापित करण्यासाठी काढलेल्या निविदांचा फेरविचार करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

  महाजनको कंपनीने चंद्रपूर, कापरखेडा व भुसावळ येथील ५०० मेगावॅटचे ५ प्रकल्प व कोराडी येथे फ्लू गॅस डिसल्फ्युरायझेशन संच (FGD) स्थापित करण्यासाठी निविदा काढल्या  आहेत. सदर दोन्ही निविदा प्रक्रिया राबविताना महाजनकोने आपल्या मर्जीतील कंपन्यांना सदर काम मिळावे, यासाठी भारत सरकारने निर्गमित केलेल्या दिनांक २३ फेब्रुवारी, २०२३ रोजीच्या नियम १४४ (११) अंतर्गत निविदेसंदर्भातील निबंधाबाबत सूचनेचे उल्लंघन केले आहे. तसेच काही काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या कंपन्यांना सदर निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची परवानगीही देण्यात आली. त्यामुळे प्रदुषणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या फ्लू गॅस डिसल्फ्युरायझेशन संच (FGD) स्थापित करण्याचे काम चांगल्याप्रकारे होईल किंवा नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 

     कोराडी येथील फ्लू गॅस डिसल्फ्युरायझेशन संच (FGD) स्थापित करण्याच्या ऑनलाइन निविदा प्रणालीमध्ये बऱ्याच तांत्रिक त्रुटी होत्या. त्यामुळे सदर बाब ही गंभीर असून या दोन्ही निविदांचा फेरविचार करण्यात यावा, अशी मागणी दानवे यांनी केली आहे. 

    दोन्ही निविदा विभाजित करुन नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) आणि उर्जा मंत्रालय (MOP) चे मार्गदर्शन घ्यावे, ज्यामुळे महाराष्ट्र सरकारचा होणारा खर्च कमी होईल.   तसेच  गुजरात, हरियाणा, छत्तीसगड राज्यातील महाजनकोने केलेल्या तृतीय पक्ष निविदा प्रणाली प्रभावी आणि पारदर्शक ठरल्या आहेत. त्यामुळे महाजनकोन या निविदांसाठी MSTC आणि TCIL सारख्या तृतीय पक्ष निविदा प्रणाली राबवावी. जेणेकरून ही प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल. या दोन्ही सूचना विचारात घेतल्यास  राज्य शासनाची फसवणूक होणार नाही व महाजनकोस पारदर्शक निविदा राबविण्यास मदत होईल. अशा सूचना दानवे यांनी ऊर्जा विभागाला केल्या आहेत.

  या प्रकरणाची सखोल चौकशी करुन निविदेप्रकरणी दोषी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी दानवे यांनी केली आहे.