निवडणूक आयोगाचा निकाल एकतर्फी ; उद्धव ठाकरे आक्रमक

मुंबई ,२० फेब्रुवारी /प्रतिनिधी :-निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला ‘शिवसेना’ नाव आणि पक्षाचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ अधिकृतपणे दिले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. निवडणूक आयोगाचा निकाल एकतर्फी असून आपण तो मानायला तयार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. शिवाय निवडणूक आयोग रद्द करावा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “हा वाद सुरू झाला तेव्हा निवडणूक आयोगाने आम्हाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते. सदस्य संख्या दाखवा, असे सांगण्यात आले होते. त्यानंतर चार-सहा महिने मधे निघून गेले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठिकठिकाणी जाऊन शपथपत्रे तपासली. त्यात काहीही खोटे नाही, सर्व कागदपत्रे बरोबर आहेत, असा अहवाल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिला आहे.

निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या नमुन्यानुसार आम्ही शपथपत्रे दाखल केली. पाऊस पडत असताना आम्ही सर्व प्रतिज्ञापत्रे सुरक्षितपणे आयोगाकडे नेली. आमच्याकडे रद्दी जमा झाली होती, त्यामुळे आम्ही ही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे जमा केली नाहीत. तुम्हाला तुमच्या पदाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल, असे निवडणूक आयोगानेच सांगितले. तसेच सभासद संख्या दाखवावी लागेल. त्यानुसार आम्ही सर्व कागदपत्रे सादर केली, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, लाखोंनी नोंदणी केल्यानंतर अचानक निवडणूक आयोगाने शपथपत्रे चालणार नाहीत, असे सांगायला सुरुवात केली. तुमच्या पक्षाने निवडून दिलेल्या बहुसंख्य सदस्यांनी ते ठरवले जाईल. मात्र संबंधित आमदार पात्र की अपात्र हे आधी ठरवावे. जर तुम्हाला हेच करायचे असेल तर आम्हाला इतके कष्ट का करायला लावले? 

या सर्व घटना पाहिल्यानंतर सध्याचा निवडणूक आयोग रद्द करून निवडणूक प्रक्रियेत निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करावी, ही शिवसेनेची मागणी आहे. कारण हा निकाल मी मानायला तयार नाही. हा सरळसरळ अन्याय आहे. परवा अमित शहा महाराष्ट्रात आले. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या युतीला भाजप-शिवसेना युती म्हटले, पण ती युती नाही. हे चोरलेले धनुष्य बाण आहे. असेही ते म्हणाले. 

ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के

शिवसेना ठाकरे गट चांगलाच अडचणींमध्ये सापडला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह शिंदे गटाच्या नावावर केले. यानंतर आता शिंदे गटाने शिवसेना कार्यालयांवर दावा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या सर्व घटनेनंतर ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. मात्र, न्यायालयाने त्यांना उद्या येण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. त्यानंतर त्यांनी या निर्णयाला आव्हान देण्याचे ठरवले. उद्धव ठाकरे गटाचे वकिल सर्वोच्च न्यायालयात गेले. मात्र, न्यायालयाने तातडीने सुनावणी करण्यास नकार देत उद्या येण्याचे निर्देश दिले. ठाकरे गटाने ही याचिका आज न्यायालयात मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाने उद्या रीतसर मेन्शनिंग लिस्ट अंतर्गत यायला सांगितले. त्यामुळे आता उद्या सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.