मुख्यमंत्री पदासाठी ‘त्यांनी’ विरोधी पक्षांचे तळवे चाटले; अमित शाह ठाकरेंवर बरसले

अमित शाहांचा पुण्यातून ठाकरेंवर पलटवार!

पुणे,१८ फेब्रुवारी/ प्रतिनिधी :-  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुण्यामध्ये मोदी @ 20 या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अमित शाह यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी निवडणूक आयोगात शिंदेंच्या बाजूने लागलेल्या निकालावर भाष्य केलं आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. आम्ही विचारांशी बांधील आहोत, सत्ता मिळवण्यासाठी वडिलांचे विचार सोडणारे नाही. काल निवडणूक आयोगाने दूध का दूध पानी का पानी केलं, असा टोला अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

‘काल खूप मोठा विजय आपल्याला मिळाला. शिंदे साहेबांना धनुष्यबाण मिळालं. 2019 ला आमच्यासोबत निवडणूक लढली, मोदींचा फोटो लावून प्रचार केला आणि मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्याबरोबर गेले. निवडणुकीत जय पराजय होत असतात, पण जे लोक धोका देतात त्यांना सोडता कामा नये,’ असा इशारा अमित शाह यांनी दिला.

काल एक निर्णय झाला आणि एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव मिळाले. मागच्या वेळी आम्ही निवडणूक एकत्र लढली पण मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी विरोधी पक्षांचे तळवे चाटले, असा घणाघात अमित शाह यांनी ठाकरेंवर केला आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती म्हणून लढेल, जे धोका देतात त्यांना कधी क्षमा केली नाही पाहिजे, असं अपिल मी कार्यकर्त्यांना करायला आलो आहे, असं अमित शाह म्हणाले.

आम्ही विचारांशी बांधील आहोत, सत्ता मिळवण्यासाठी वडिलांचे विचार सोडणारे नाहीत, असा टोला शाहांनी उद्धव ठाकरेंना लगावला.या कार्यक्रमात अमित शाह यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. ‘यूपीए सरकारच्या काळात दहशतवादी दिवसाढवळ्या देशात यायचे, आपल्या जवानांना मारून निघून जायचे. महिला सुरक्षित नव्हत्या, देशाच्या पंतप्रधानांना जगात मान नव्हता. देशाचे पंतप्रधान लिहून दिलेलं भाषण वाचायचे. सिंगापूरचे भाषण थायलंड आणि थायलंडचे भाषण सिंगापूरमध्ये वाचायचे,’ असा टोला अमित शाह यांनी मनमोहन सिंह यांना लगावला.