रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; कोश्यारींचा राजीनामा मंजूर

“महाराष्ट्राची झाली सुटका…” भगतसिंग कोश्यारींच्या राजीनाम्यावर काय म्हणाले राष्ट्रवादीचे नेते?

मुंबई,१​२​ फेब्रुवारी/ प्रतिनिधी :-महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. तसेच रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चांगलंच महागात पडलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. राज्यपाल कोश्यारी यांनी नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं पदाचा राजीनामा दिला होता. कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला.

आता महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर रमेश बैस येणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली आहे. त्यात महाराष्ट्राच्या राज्यपालांचाही समावेश आहे.

नवे राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या रमेश बैस यांची कारकीर्द

रमेश बैस हे यापूर्वी झारखंडचे राज्यपाल म्हणून काम पाहत होते. तर, २०१९ मध्ये त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल म्हणूनही काम केले. तसेच, ते तब्बल ७ वेळा खासदार म्हणून निवडणून आले आहेत. त्यांचा जन्म हा २ ऑगस्ट १९४७चा असून १९७८मध्ये ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते.त्यानंतर रमेश बैस यांनी १९८२ ते १९८८ या काळात मध्य प्रदेशचे राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले. पुढे १९८९मध्ये रमेश बैस हे पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत उतरले आणि विजय मिळवत संसदेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात अनेक केंद्रीय मंत्रीपदे सांभाळली. त्यानंतर २०१९मध्ये त्यांची निवड ही त्रिपुराचे राज्यपाल म्हणून करण्यात आली.

नवे राज्यपाल म्हणून नियुक्त झालेले रमेश बैस हेदेखील अनेकदा चर्चेत आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून रमेश बैस यांचा झारखंड सरकारशी संघर्ष सुरु होता. त्यांनी झारखंड विधानसभेने संमत केलेले ‘झारखंड वित्त विधेयक – २०२२’ २ दिवसांआधीच राज्य सरकारकडे परत पाठवले. तिसऱ्यांदा त्यांनी हे विधेयक परत पाठवल्यामुळे झारखंड सरकार आणि राज्यपाल असा संघर्ष दिसून आला.

तसेच, झारखंडमध्ये सुरु असलेल्या राजकीय गोंधळ सुरु असताना राज्याच्या २२व्या स्थापना दिनाच्या सोहळ्यादिवशी राज्यपाल रमेश बैस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते, मात्र ते आलेच नाहीत. झारखंडच्या स्थापना दिनादिवशी राज्यपाल गैरहजर राहणे २२ वर्षांच्या इतिहासात ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे आणखी एक नवा वाद निर्माण झाला होता. तसेच, त्यांनी, “दिल्लीत फटाक्यांना बंदी आहे, पण झारखंडमध्ये कधीही ‘अणू बॉम्ब’ फुटू शकतो.” असे विधान केले होते. यामुळे झारखंडच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली होती. मात्र, राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

भगतसिंग कोश्यारींच्या राजीनाम्यावर काय म्हणाले राष्ट्रवादीचे नेते

महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा अखेर राष्ट्रपतींकडून मंजूर करण्यात आला. यानंतर आता विरोधकांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहेत. भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेळोवेळी टीका केली होती. या निर्णय ते म्हणाले की, “माझ्या मते महाराष्ट्राची सुटका झाली. हा अतिशय चांगला निर्णय घेण्यात आला आहे. पण, हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. यावेळी त्यांना पत्रकारांनी विचारले की, राज्यपालांनी संविधान विरोधी जे निर्णय घेतले होते, त्याचे काय होणार? यावर ते म्हणाले की, “जर संविधानाच्या विरोधात काही झाले असेल तर त्याची चौकशी व्हायला हवी.”

तसेच, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट केले की, “महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि राज्यघटनेच्या विरोधात काम करून घटनाबाह्य सरकारला शपथ देणाऱ्या महोदयांमुळे राज्यपालपदाची शोभा कमी झाली आहे. महाविकास आघाडीची राज्यपाल बदलण्याची मागणी होतीच, म्हणूनच महाराष्ट्रात नवीन राज्यपाल येणार या वृत्ताचे आम्ही स्वागत करतो. नवीन राज्यपाल आधीच्या महोदयांप्रमाणे भाजपच्या हातचे बाहुले बनणार नाहीत,” असे म्हणत त्यांनी टोलादेखील लगावला आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “उशिरा का होईना राज्यपाल यांचा राजीनामा मंजूर झाला. नवे येणारे राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबत दहा वर्षे काम केले आहे. त्यामुळे त्यांनाही मी जाऊन भेटणार आहे. राजकीय विषय बाजूला ठेवा, पण महापुरुषांच्या बद्दल केलेले भाष्य अतिशय दुर्दवी आहे.” अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.