मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत सात महिन्यांत ३ हजार ६०० रुग्णांना २८ कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत

मुंबई ,​५​ फेब्रुवारी  / प्रतिनिधी :- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे.  सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या सात महिन्यांत  3 हजार 600 रुग्णांना 28 कोटी रुपयांपेक्षा अधिकची वैद्यकीय मदत केली आहे.

जुलै महिन्यात 194 रुग्णांना 83 लाखांची मदत, ऑगस्ट – 276 रुग्णांना 1 कोटी 40 लाख, सप्टेंबर – 336 रुग्णांना 1 कोटी 93 लाख, ऑक्टोबर – 256 रुग्णांना 2 कोटी 21 लाख, नोव्हेंबर – 527 रुग्णांना 4 कोटी 50 लाख,डिसेंबर -1013 रुग्णांना 8 कोटी 52 लाख, जानेवारी 2023 मध्ये 1060 रुग्णांना विक्रमी 8 कोटी 89 लाख रुपयांची वैद्यकीय मदत करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या निकषात बदल करुन काही खर्चिक उपचार असणाऱ्या आजारांचा समावेश नव्याने करण्यात आला आहे. जास्तीत जास्त गरजू रुग्णांना सहाय्यता करता यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार नवीन आजारांचा समावेश करण्यात आला. याचा सकारात्मक परिणाम म्हणून नव्याने समाविष्ट या आजारांच्या अनेक रुग्णांना मदत उपलब्ध झाली आहे. यामुळे निधीच्या वितरणात वाढ झाली आहे, अशी माहिती  मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली.