ब्राह्मण उमेदवार नसल्याने… उमेदवारी न मिळाल्याने शैलेश टिळक यांनी व्यक्त केली नाराजी

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर

कसब्यातून हेमंत रासने तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप निवडणूक लढणार

पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवडमध्ये होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी अखेर भाजपने उमेदवार जाहीर केले. यामध्ये हेमंत रासने यांना कसब्यातून तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा विधानसभा मतदार संघात टिळक कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. मात्र भाजपने त्यांच्या जागी हेमंत रासने यांनी उमेदवारी दिली आहे.

या निवडणुकीत भाजपने दिवंगत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबाला डावलले अशी चर्चा होत असतानाच यावर पालकमंत्री आणि भाजपनेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, देवेंद्रजी आणि मी टिळक कुटुंबाला भेटून योग्य ते स्थान देण्यात येईल, अशाप्रकारे आश्वस्त केले आहे. त्यांनी देखील पक्षासोबत राहू असे म्हटले आहे. तसेच जगताप यांच्या कुटुंबात कोणताही वाद नव्हता. लक्ष्मण जगताप यांच्या मुलाने समजदारी दाखवली. आमचं कुटुंब कोणीही तोडू शकणार नाही. ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्या पाठिंशी संपूर्ण कुटूंब राहिल, असे त्यांच्या मुलाने सांगितल्याचे पाटील यांनी म्हटले.

टिळक कुटुंबाला डावलण्यात आले का, या प्रश्नावर पाटील म्हणाले की, टिळक कुटुंबाशी चर्चा करून ही निवडणूक जिंकणे किती महत्त्वाचे आहे, हे पटवून दिले. त्यावर शैलेंद्र टिळक आणि कुणालला महाराष्ट्राचा प्रवक्ता म्हणून घोषित केले आहे. टिळक कुटुंबाच्या पाठिशी आम्ही आहोत, असेही पाटील यांनी म्हटले.

शैलेश टिळक यांनी व्यक्त केली नाराजी

मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी मिळेल अशी आशा होती. आम्ही पक्षाकडे तिकीटाची मागणीही केली होती. पण तिकीट देण्यात आले नाही. का दिले नाही माहीत नाही? अशी भावूक प्रतिक्रिया व्यक्त करताना मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांचा कंठ दाटून आला होता. त्यांच्या डोळ्यात पाणीही आले होते. शैलेश टिळक नाराज असल्याने कसबा पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

हेमंत रासने यांना कसब्यातून भाजपकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यानंतर शैलेश टिळक यासंबंधी बोलताना म्हणाले की, पक्षाकडे उमेदवारी मागितली होती परंतु वेगळा निर्णय घेतला गेला. पक्षाच्या या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते पुढे म्हणाले की, पक्षाने घेतलेला निर्णय मान्य आहे परंतु मुक्ता टिळक यांच्या कामावर अन्याय झाला आहे. त्यामुळे मनात खंत आहे. कोणतीही पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर साधारण एखाद्याच्या घरातील व्यक्तीचे निधन झाले असेल तर त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला नैसर्गिकपणे उमेदवारी दिली जाते. मीही उमेदवारीची मागणी केली होती, असे शैलेश टिळक म्हणाले.मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर नैसर्गिक न्यायाने कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळायला पाहिजे होती. आपल्याला उमेदवारी दावलल्यामुळे ब्राह्मण समाजामध्ये अन्यायाची भावना निर्माण होऊ शकते, अशी प्रतिक्रिया शैलेश टिळक यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काल चर्चा झाली. उमेदवारी देण्याबाबत अजून काही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले होते. दिल्लीतून निर्णय होईल असे त्यांनी सांगितले होते. आज उद्या निर्णय होईल असेही ते म्हणाले होते. तसेच ताई गेल्यानंतर घरी यायचे राहिले होते. त्यामुळेही फडणवीस काल घरी आले होते. काल त्यांनी कोणतेही संकेत दिले नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आम्ही पक्षासोबतच राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपकडून टिळक कुटुंबाबाहेरील उमेदवार देण्यात आला आहे. हेमंत रासने हे स्थायी समितीचे तीन वेळा अध्यक्ष राहिले आहेत.