केंद्राच्या पाठबळाने मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मी मोदींचाच माणूस-मुख्यमंत्री शिंदे

मुंबई महापालिकेवर २०-२५ वर्ष ज्यांची सत्ता होती त्यांनी स्वत:ची घरे भरली-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई ,१९ जानेवारी  / प्रतिनिधी :- प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या विविध प्रकल्पांमुळे मुंबई अधिक वेगाने धावू शकणार आहे. तीन वर्षांत मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ आमच्यासोबत आहे.

वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान मोदींचे जिव्हाळ्याचे नाते होते. हिंदुत्व हा विचारांचा धागा होता आणि विकासाचे राजकारण हा पाया होता. मेट्रो, शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक लवकरच उद्धाटन होईल. रस्ते, रेल्वे, सागरी महामार्ग याचा दळणवळण आराखडा महाराष्ट्राच्या मातीतून जगासमोर ठेवतोय. इच्छाशक्ती दाखवल्यामुळे मुंबईतील अनेक प्रकल्प मार्गी लागताहेत. ४५० किमी रस्ते सिमेंट क्रॉकिंटचे होणार आहेत. दोन अडीच वर्षात संपूर्ण मुंबई खड्डेमुक्त होईल आणि लोकांचे जीवन सुसज्ज होईल. काही लोक खोडा घालण्याचे काम करतायेत. त्यांना ते काम करू द्या. दरवर्षी पडणारे खड्डे आणि खड्ड्यातून जाणारे बळी रोखण्याचे काम आम्ही करतोय. निष्पाप लोकांचे बळी जाणार नाहीत. डांबरीकरणाच्या नावाखाली काळे-पांढरे करणाऱ्या लोकांची दुकाने यामुळे बंद होणार आहेत हे खरे दु:ख आहे, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

त्याचसोबत त्यांच्या टीकेला आम्ही उत्तर कामाने देऊ. जेवढी टीका कराल त्याच्या १० पटीने काम करू. ६ महिन्यात सरकारने अनेक निर्णय घेतले त्यामुळे काहींच्या पोटात मळमळ होतेय, जळजळ होतेय. छातीत धडकी भरली आहे. ६ महिन्यात इतके काम केले तर पुढील २ वर्षात किती काम होईल, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना लगावला.

सुवर्ण अक्षरात नोंद करावी असा दिवस

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मुंबईकरांचे जगणे सुसह्य करण्याची सुरूवात आहे. येत्या दोन वर्षांत त्याचा कायापालटही पहायला मिळेल आणि आजच्या दिवसाची सुवर्ण अक्षरात नोंद करावी अशीच आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्याच हस्ते ऑक्टोबर २०१५ मध्ये मेट्रोचे भूमिपूजन झाले होते आणि त्यांच्याच हस्ते आज उद्घाटनही होत असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. म्हणूनच अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यासाठी प्रधानमंत्र्यांना आम्ही मुंबईत आमंत्रित केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या समृद्धीची सुरूवात

गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये देशातल्या गेमचेंजर समृद्धी महामार्गाची सुरुवात झाली. आता नव्या वर्षाची सुरुवात आपण मुंबईकरांसाठी मेट्रो सुरु करीत आहोत. एक कार्यक्रम राज्याच्या उपराजधानीत झाला आणि आज राज्याच्या राजधानीत हा अभूतपूर्व सोहळा होतोय, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राची भाग्यरेषा असलेल्या समृद्धी महामार्गामुळे राज्यात ‘समृद्धी’ दाखल होत आहे.

समृद्धी असो, मेट्रो असो किंवा येत्या नोव्हेंबरपासून सुरु होणारा समुद्रावरील सर्वात लांब मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प आहे. आम्ही रस्ते, रेल्वे, सागरी मार्ग उभारून देशातला एक आदर्श असा वाहतूक आणि दळणवळण आराखडा जगासमोर ठेवत आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आता या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये आम्ही मेट्रो ३ चा पहिला टप्पा सुरु करणार आहोत. ही मेट्रो लवकरच लाखो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. मुंबई महानगरात ३१४ किलोमीटर मेट्रोच्या निर्माण होणाऱ्या जाळ्यामुळे मुंबईतील ३० ते ४० लाख वाहने कमी होतील. वेळेची बचत होईल. प्रदूषण कमी  होईल. कोस्टल रोडचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले असून नवी मुंबई मेट्रो लवकरच सुरु होईल, असेही ते म्हणाले.

विकासाला मानवी चेहरा देणार

गेल्या सहा महिन्यात आम्ही जे काम केले आहे, त्यावर मुंबईकर जनतेचा विश्वास आहे, आणि एकदा विश्वास टाकला की, मुंबईकर त्याची साथ कधीही सोडत नाही  हा इतिहास आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील विविध प्रकल्पांची माहिती दिली. ते म्हणाले की, केवळ रस्ते, पूल बांधणे म्हणजे विकास नाही. विकासाला मानवी चेहरा पाहिजे. आज आम्ही आणखी एक स्वप्न सत्यात उतरवतो आहोत ते म्हणजे ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरु करतोय. मुंबईतील सांडपाणी पुनर्प्रक्रिया, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि सुशोभिकरण हे सर्वच आता मार्गी लागणार आहे. त्यामुळे मुंबई हे खरोखर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर होणार आहे.

मुंबईतील सगळ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला असून याचीही सुरुवात आज होते आहे. काँक्रिटीकरण केल्यानंतर किमान २५ वर्ष रस्ते सुस्थितीत राहतील. संपूर्ण मुंबईला खड्डेमुक्त करण्याच्या या निर्णयाला सर्वांनी पाठींबा दिला पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सर्वसामान्य मुंबईकरांसाठी

मुंबईकर मुंबईच्या बाहेर जाऊ नये याला आमचे प्राधान्य आहे. सर्वसामान्य मुंबईकर माणसाला स्वस्तात घरे मिळाली पाहिजेत यासाठी घरांच्या विविध योजना आम्ही राबवित आहोत. पुनर्विकासाला गती आणतो आहोत, पोलिसांना, कामगारांना घरे देत आहोत असे सांगून मुख्यमंत्र्यांनी धारावी पुनर्विकासाचे उदाहरण दिले.

यावेळी त्यांनी राज्य शासनाने सामाजिक भावनेतून घेतलेल्या निर्णयांविषयीही सांगितले. पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणे, स्वतंत्र दिव्यांग विभाग, ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत, दिवाळीत शंभर रुपयांत शिधा, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सुविधा संपन्न कुटुंब मिशन, चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी, शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना निकषापेक्षा दुपटीने जास्त मदत असे अनेक निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.

दावोस दौऱ्यात अनेक उद्योजकांबरोबर बैठका झाल्या. प्रत्येकाने प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्याबद्दल आदर व विश्वास व्यक्त केला. ते आमचे नेते व मार्गदर्शक आहेत याचा अभिमान तर आहेच, पण एक भारतीय म्हणून अभिमान वाटला असे सांगून मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला मिळालेल्या गुंतवणुकीविषयी माहिती दिली.

मी मोदींचाच माणूस-मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्री शिंदे दावोसमध्ये गेले असता त्यांना आलेल्या पंतप्रधान मोदींच्या प्रचितीचा अनुभवदेखील सांगितला. ते म्हणाले की, “जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भक्त आहेत. जागतिक आर्थिक परिषदेसाठी दावोसमध्ये गेलो होतो. त्याठिकाणीही मोदींचीच हवा होती. अनेक देशाच्या पंतप्रधानांनी फक्त मोदींबद्दलच विचारले होते. काही परदेशी लोकांनी मला विचारले होते की, ‘तुम्ही मोदींसोबत आहात का?’ त्यावर मी त्यांना म्हणालो की मी त्यांचाच माणूस आहे.”

विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचा किती विकास झाला? आपण पाहिले की विकासकामांना खोडा घालण्याचे काम काहीजण करत आहेत. त्यांना त्यांचे काम करु द्या. दरवर्षी मुंबईकरांचा रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये गेलेले पैसे वाचवण्याचे काम करतो आहोत. पण हे काही लोकांना मान्य नाही. मुंबईचे रस्ते हे खड्डेमुक्त करण्याचा आमचा निर्धार आहे. पुढील ३० ते ४० वर्षे रस्त्यांना खड्डे पडणार नाहीत. म्हणून डांबरीकरणाच्या निमित्ताने काळे-पांढरे करणाऱ्या लोकांची दुकाने बंद होतील, हे त्यांचे दु:ख आहे.” अशी टीका करत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरें आणि गटाला टोला लगावला. 

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचा विकास किती झाला हे सगळ्यांना माहित आहे. ठप्प झालेल्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी आणि लोकोपयोगी योजनांचा श्वास गुदमरला होता त्यातून लोकांची सुटका करण्याची संधी आम्हाला मिळाली ती केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसी नेतृत्वामुळे. मी जेव्हा कधी मोदींना भेटतो तेव्हा त्यांच्याकडून ऊर्जा मिळते. येत्या २ वर्षात मुंबईचा कायापालट झालेला आपल्याला पाहायला मिळेल. आजचा दिवस सुवर्ण अक्षराने लिहावा लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना याच मेट्रोचे भूमिपूजन मोदींनी केले होते त्याच मेट्रोचे लोकार्पण करण्यासाठी आज ते इथे आले आहेत. हा चांगला योगायोग आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले.

राज्यातील विकासाला प्रधानमंत्री मोदी यांचे बळ – उपमुख्यमंत्री फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. ज्या योजनांचे भूमिपूजन प्रधानमंत्री यांच्या हस्ते झाले, त्यांच्याच हस्ते या प्रकल्पांचे लोकार्पण होत आहे. ही विकासाची बदललेली संस्कृती आहे.मुंबई महापालिकेवर २०-२५ वर्ष ज्यांची सत्ता होती त्यांनी केवळ डिपॉझिट केले. स्वत:ची घरे भरली परंतु मुंबईकरांना स्वच्छ पाणी दिले नाही. टक्केवारीमुळे अनेक कामे केली नाही. ४ वर्षापूर्वी मुंबईच्या रस्त्यांचे परीक्षण केले. त्यावेळी रस्त्याखालची पातळीच गायबच आहे हे आढळले. ४० वर्ष रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत त्यासाठी सिमेंट कॉक्रिंटचे रस्ते बनवण्याचे काम होणार आहे. आज त्याचे भूमिपूजन होईल, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीकेसी येथील जाहीर सभेत शिवसेना ठाकरे गटाला लक्ष्य केले.

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेला मध्यंतरी खीळ बसली होती. पुन्हा राज्य शासनाने ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील एक लाखाहून अधिक फेरीवाल्यांना त्याचा लाभ होणार आहे. मुंबईच्या बाहेर राज्याच्या इतर भागातही आगामी काळात ही योजना लागू करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर मुंबईत शिवसेनेतील बंडखोरी आणि शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना यावर भाष्य केले. “काही लोकांनी बेईमानी केली. त्यामुळे अडीच वर्षे जनतेच्या मनातील सरकार स्थापन झाले नाही. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांचे खरे अनुयायी एकनाथ शिंदेंनी हिंमत केली आणि पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जनतेच्या मनातील सरकार स्थापन झाले. यानंतर महाराष्ट्र पुन्हा एकदा विकासाच्या दिशेने वेगाने धावू लागला,” असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

“आज अनेक उद्घाटनं होणार आहे, त्यात पंतप्रधान स्वनिधी कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. कोरोना काळात पंतप्रधान मोदींनी टपरीवाल्यापासून हातगाडीवाल्यापर्यंत सर्वांचा विचार करून त्यांच्यासाठी स्वनिधीची निर्मिती केली. मात्र, त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली आणि त्यात गरिबांना पैसे देणारी योजना महाराष्ट्रात लागू न करण्याचा निर्णय घेण्यात आला,” असा आरोपही फडणवीस यांनी केला.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमामुळे मुंबईचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. धारावी येथील एक लाख लोकांचे पुनर्वसन करण्याचा प्रकल्प केवळ केंद्र सरकारने रेल्वे विभागाची जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्यामुळे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.